रस्ते सुरक्षा अभियान
esakal December 27, 2025 06:45 AM

सोमेश्वरनगर, ता. २३ : ‘‘बेफिकिरी, हेल्मेटचा अभाव, अतिवेग, वाहतुकीचे नियम मोडणे हीच अपघातांची प्रमुख कारणे आहेत. आपण परदेशात नियमांचे काटेकोर पालन करतो मात्र इथे दुर्लक्ष करतो ही गंभीर बाब आहे,’’ अशी खंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी व्यक्त केली.

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियम’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत निकम बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल शेलार, गोरखनाथ बोऱ्हाडे, किशोर शेळके, उपप्राचार्य डॉ. जया कदम, डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. संजू जाधव उपस्थित होते.

निकम व शेलार यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींशी अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम, तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच युवक-युवतींना वाहतूक नियमावलीच्या पत्रकाचे वाटप केले. तसेच परिवहन विभाग शिकाऊ वाहन परवान्यापासून ते वाहन कर्जबोजा रद्द करण्यापर्यंत तब्बल ११५ सेवा ऑनलाइन आणि २८ सेवा फेसलेस पद्धतीने देत असल्याची माहिती कार्यशाळेत दिली.
कार्यक्रम अधिकारी डॉ. आदिनाथ लोंढे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार मानले.

... तर पालकांवरच कारवाई
अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. अपघातग्रस्त लोकांना वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले. तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच सध्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहतूक नियमभंगावर दंडात्मक कारवाई करणार आहोत. यात कुणालाही सवलत नाही. त्यामुळे सर्वांनी नियम पाळा, असा इशाराही दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.