ICC U19 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, आयुष म्हात्रेकडे नेतृत्व, पहिला सामना केव्हा?
GH News December 28, 2025 12:10 AM

बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर आता 27 डिसेंबरला बीसीसीआयने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतही मुंबईकर खेळाडूकडे संघाची धुरा देण्यात आली.  मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विहान मल्होत्रा याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली आहे. तसेच वैभव सूर्यवंशी याचाही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेबाबत थोडक्यात

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धएचं आयोजन हे झिंबाब्वे आणि नामिबिया इथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघात 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान एकूण 41 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सहभागी 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया साखळी फेरीत अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 15 जानेवारीला खेळणार आहे. भारतासमोर पहिल्याच सामन्यात अमेरिकेचं आव्हान असणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित होतील. त्यातून 2 संघात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सामना होईल आणि विश्वविजेता निश्चित होईल.

टीम इंडियाच्या साखळी फेरीतील सामन्याचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध अमेरिका, बुलावायो, 15 जानेवारी

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, बुलावायो, 17 जानेवारी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, बुलावायो, 24 जानेवारी

टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकणार?

दरम्यान इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. भारताने तब्बल 5 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप उंचावला आहे. भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 साली ही ट्रॉफी जिंकली होती.त्यामुळे यंदा भारताकडे एकूण सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंडर 19 टीम इंडिया

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, मोहम्मद ईनान, हेनिल पटेल, देवंद्रन दीपेश, किशन कुमार सिंह आणि उधव मोहन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.