Battle of Galwan: 'जख्म लगे तो मेडल समझना', अंगावर काटा आणणारा सलमानच्या चित्रपटाचा टीझर
Tv9 Marathi December 28, 2025 01:45 AM

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने त्याच्या 60 व्या वाढदिवशी चाहत्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर म्हणजे केवळ एक बर्थडे सरप्राइज नाही तर आपल्या सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना आणि त्यांच्या आढळ धैर्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे. या टीझरच्या अखेरिस या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

1 मिनिट 12 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात सलमान खानच्या व्हॉइस ओव्हर आणि लडाखमधील गलवानच्या खोऱ्यांच्या दृश्यांनी सुरुवात होते. यामध्ये सलमान म्हणतो, “जवानों याद रहे जख्म लगे तो मेडल समझना और मौत दिखे तो सलाम करना” (सैनिकांनो लक्षात ठेवा जर तुम्ही जखमी झालात तर त्याला पदक समजा आणि जर तुम्हाला मृत्यू दिसला तर त्याला सलाम करा). त्यानंतर तो बिरसा मुंडा, बजरंग बली आणि भारत माता की जय असा जयघोष करताना दिसतो. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पहा टीझर-

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय. सलमानशिवाय दुसऱ्या कोणत्याच कलाकाराची झलक यात पाहायला मिळत नाही. टीझरच्या अखेरीस सलमान म्हणतो, ‘मौत से क्या डरना, उसे तो आना है।’ अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल आणि त्यातील इतर कलाकारांबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु सलमानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.

याआधी सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदानाने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नाही. त्याच्याआधी सलमानचा ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन्ही चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई करू शकले. त्यामुळे आता ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.