टीम इंडियाने सलग 2 वेळा विराट कोहली आणि त्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली. मात्र टीम इंडियाला दोन्ही वेळेस पराभूत व्हावं लागलं. आधी न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला दोन्ही वेळेस उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप फायनल 2023-2025 या साखळीच्या अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. त्यानंतर टीम इंडियाची या चौथ्या साखळीत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. अशात आता टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा होणार आणि अंतिम फेरीत पोहचण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया कितव्या स्थानी?ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. भारताने या साखळीत आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने पराभूत केल्यानंतर भारताचं या साखळीतील अंतिम फेरीत पोहचणं फार अवघड झालं आहे. मात्र त्यानंतरही भारताला संधी कायम आहे.
भारताची चौथ्या साखळीतील कामगिरीटीम इंडियाने डबल्यूटीसी 2025-2027 या चौथ्या साखळीतील आपली पहिली मालिका इंग्लंड विरुद्ध खेळली. भारताने ही 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर भारताने मायदेशात वेस्ट इंडिजचा 2-0 ने धुव्वा उडवला. मात्र भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव चांगलाच महागात पडला. त्यामुळे भारताची रँकिंगमध्येही घसरण झाली.
टीम इंडियाने या चौथ्या साखळीत 9 सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 4 सामने गमावले आहेत. तर 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. टीम इंडिया या रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी आहे.
भारताला अंतिम फेरीत पोहचण्याची किती संधी?भारताचे या साखळीतील 9 सामने बाकी आहेत. भारताला 9 पैकी 8 सामने जिंकावे लागतील. भारताने 8 सामने जिंकल्यास विजयी टक्केवारी ही 70 इतकी होईल. अशा परिस्थितीत टीम इंडियाची अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता वाढेल.
दरम्यान टीम इंडियाच्या पुढील दोन्ही कसोटी मालिका या विदेशात होणार आहेत. टीम इंडिया आपली पुढील कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे.