मुंबई महापालिका निवडणुसाठी भाजप, शिवसेना युतीचा फॉर्म्यूला ठरला, कोण किती जागा लढवणार?
Tv9 Marathi December 28, 2025 08:45 AM

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागा वाटपासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईमध्ये भाजप 128 जागा लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गट 79 जागा लढवणार आहे, अजूनही वीस जागांवर तोडगा निघालेला नाहीये.

नेमकं काय म्हणाले अमित साटम? 

जागा वाटपाची चर्चा या ठिकाणी झालेली आहे, भाजप 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवर आमचं एक मत झालेलं आहे, उर्वरीत 20 जागांवर अजूनही पेच कायम आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा, काढण्यात येईल,  असं यावेळी अमित साटम यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार

दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढवणार आहे. एकीकडे या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे, मात्र दुसरीकडे आता ही निवडणूक अजित पवार गट स्वबळावर लढवणार असून, पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे.

शिवसेना ठाकरे गट मनसे युती 

गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार अशी चर्चा सुरू होती, अखेर बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस देखील स्वबळावर लढण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चाचपणी सुरू आहे. शुक्रवारी याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतती होती, दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र अजूनही युतीचा निर्णय झालेला नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.