पुणे - महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेची कामे विविध तांत्रिक कारणांमुळे अजूनही संथ गतीने सुरू आहेत. योजना जाहीर झाल्यापासून आठ वर्षे उलटल्यानंतरही योजनेतील जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन व पाण्याच्या टाक्यांची कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होऊन, प्रत्यक्षात पाणी मिळण्यासाठी पुणेकरांना आणखी तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे.
शहरातील विविध भागांसह समाविष्ट गावांमधील नागरिकांना पाणी टंचाईच्या प्रश्नाला वर्षानुवर्षे सामोरे जावे लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने २०१७ मध्ये ‘समान पाणीपुरवठा’ योजना जाहीर केली. सुमारे ९७३ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामाला सुरवात झाली. मात्र, सुरवातीपासून कोरोनासह वेगवेगळ्या कारणांमुळे योजनेचे काम संथ गतीने सुरू होते.
कोरोनानंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता होती. त्यानंतरही भूसंपादनामुळे कामाला गती मिळण्यास अडचण येत होती. दरम्यान, मागील वर्षभरापासून कामाला काही प्रमाणात गती मिळू लागली होती. मात्र, अजूनही भूसंपादनामुळे कामाची गती मंदावली आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात १४ पाण्याच्या टाक्यांना पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची कामे होणे बाकी आहे. ९०० मीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम अद्याप राहिलेले आहे. जागेच्या उपलब्धतेचा अभाव, जलवाहिनीच्या मार्गात येणारी पक्की घरे आणि जलवाहिन्यांमधील अंतर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तिथे जलवाहिन्यांची कामे मार्गी लागण्यास अडथळा निर्माण होत आहे.
याबरोबरच काही टाक्या, पंपिंग स्टेशन, जलवाहिन्यांची कामे अजून सुरू आहेत. पंपिंग स्टेशनवर यंत्रसामग्री जोडण्याची कामे सुरू आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे समान पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत ६७ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर १२०० किलोमीटरपैकी ११०० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
योजनेचा असा होईल फायदा...
समान पाणीपुरवठा योजनेमध्ये तब्बल १२०० किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला शहरात ठिकठिकाणी उपजलवाहिन्या जोडल्या जाणार आहेत. उपजलवाहिन्यांवर व्हॉल्व जोडून त्याद्वारे पाणीटंचाई असणाऱ्या भागातही पाणी पोहोचविणे शक्य होणार आहे. या रचनेमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याचा नियमित पुरवठा करणे शक्य होणार आहे. याबरोबरच पाणी गळतीवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेतील ८२ पैकी ६७ टाक्यांची कामे पूर्ण आहेत. उर्वरित पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या व पंपिंग स्टेशनचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. योजनेअंतर्गत बांधलेल्या काही टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका