पुणे - सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व सोलापूर जिल्हा टेनिस संघटना (एसडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद भारताच्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना या जोडीने संपादिले. तर एकेरीतून भारताच्या वैदेही चौधरीने अंतिम फेरी गाठली आहे.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित भारताच्या अंकिता रैनाने युवा खेळाडू वैष्णवी आडकरच्या साथीत भारताच्या झील देसाई व रशियाच्या एलिना नेपली या जोडीचा ४-६, ७-५, १०-६ असा पराभव करून विजेतेपद संपादिले.
अंकिता रैनाचे आयटीएफमधील दुहेरीतील अठरावे तर वैष्णवी आडकरचे तिसरे विजेतेपद आहे. उपांत्य फेरीत भारताच्या झील देसाईने एलिना नेपलीच्या साथीत जपानच्या होनोका कोबायाशी व मिचिका ओझेकी जोडीवर ३-६, ६-२, १०-६ असा तर भारताच्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना जोडीने श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी जोडीवर २-६, ७-६ (१), १०-३ असा विजय मिळविला होता.
एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात सहाव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीने आठव्या मानांकित भारताच्या वैष्णवी आडकरचा एक तास तीन मिनिटांच्या खेळानंतर ६-४, ६-२ असा सहज पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या मिचिका ओझेकीने एक तास ५३ मिनिटांच्या खेळानंतर भारताच्या दुसऱ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीचा ४-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना जोडीला करंडक व ३५ डब्ल्यूटीए गुण देण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसिजन फाउंडेशनचे चेअरमन डॉ. सुहासिनी शहा, ओयासिस रेसिडेन्सी संचालक डॉ. शंतनू गांधी, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, नितीन कन्नमवार हे उपस्थित होते.