राजस्थान: गुजरातच्या पालनपूरपासून सुरू होत दिल्लीपर्यंत पसरलेल्या अरावली पर्वतरांगाच्या विषयावरून भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. राजस्थान आणि हरियानाच नव्हे, तर दिल्लीतले राजकीय ‘तापमान’ही यामुळे तापले आहे. डोंगराच्या खाणकामासाठीच्या व्याख्येत केंद्राच्या अखत्यारीतील समितीने बदल केला होता व त्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. सत्ताधाऱ्यांनी अरावली पर्वतरांगा उद्ध्वस्त करण्याचा डाव रचल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केला आणि त्यानंतर विषयाला तोंड फुटले. डोंगर भुईसपाट झाले, तर थरच्या वाळवंटातील गरम हवेमुळे दिल्लीसह उत्तर भारताचा मोठा भाग भकास होईल, असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला.
दुसरीकडे या मुद्द्यावरून सोशल मीडियावर केंद्रावर प्रचंड टीका झाली. अखेर सरकारला दोन पावले मागे घेत नवीन खाणकामाच्या परवान्यांवर बंदी घालावी लागली. अजून तरी या विषयावरचे राजकारण थांबलेले नाही. राजस्थानमध्ये अरावली पर्वतांचे महत्त्व मोठे असल्याने काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘अरावली’वरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्यामुळे भविष्यात हा मुद्दा भाजपला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला या विषयावर ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.