Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल कमबॅकसाठी सज्ज, रोहितसोबत ओपनिंग करणार! टीममधून कुणाचा पत्ता कट होणार?
GH News December 29, 2025 02:10 AM

टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल सध्या ऑफफिल्ड आहे. यशस्वीची आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. टीम इंडिया त्याआधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. बीसीसीआय या दोन्ही मालिकांसाठी येत्या काही दिवसात भारतीय संघाची घोषणा करणार आहे. बीसीसीआय निवड समिती यशस्वीला या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात संधी देणार का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्याआधी यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

यशस्वीच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशीच (28 डिसेंबरला) गूड न्यूज मिळाली आहे. यशस्वी आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. यशस्वीला आजारी असल्याने 2 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. मात्र आता टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने आजारावर मात केली आहे. भारताचा हा वाघ कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. यशस्वी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2025-2026) स्पर्धेतून कमबॅक करणार आहे. यशस्वी गोवा विरूद्धच्या सामन्यातून एक्शन मोडमध्ये येणार आहे.

यशस्वी जैस्वाल याला काय झालं होतं?

यशस्वीला 16 डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यादरम्यान पोटात त्रास जाणवू लागला. त्यामुळे यशस्वीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यशस्वीला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे यशस्वीला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागलं.

यशस्वी जैस्वाल मैदानात कधी उतरणार?

स्पोर्टस्टारच्या रिपोर्ट्सनुसार, यशस्वी सोमवारी 29 डिसेंबरला संध्याकाळी मुंबई टीमसह जोडला जाणार आहे. मात्र यशस्वी या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. यशस्वीचा 31 डिसेंबरला गोवा विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

यशस्वी जैस्वाल आल्यास प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला डच्चू मिळणार?

दरम्यान मुंबईने या स्पर्धेतील सलग दोन्ही सामने जिंकलेत. मुंबईने सिक्कीम आणि उत्तराखंडला पराभूत केलं. या दोन्ही सामन्यात रोहित शर्मा याच्यासह अंगकृष रघुवंशी याने ओपनिंग केली. मात्र यशस्वीच्या कमबॅकनंतर अंगकृष रघुवंशी याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं. तसेच अंगकृषला त्याच्या स्थानासह तडजोड करावी लागू शकते. आता टीम मॅनेजमेंट अंतिम निर्णय काय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.