अखेर काका पुतण्या सोबत! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार, अजित पवार यांनीच केली घोषणा
esakal December 29, 2025 03:45 PM

पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा फिस्कटल्याचं वृत्त दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. दरम्यान, आता नाट्यमय घडामोडी घडल्या असून पवार काका-पुतण्या एकत्र निवडणूक लढणार आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत घोषणा केलीय. रविवारी झालेल्या भेटीगाठी आणि चर्चेनंतर हा निर्णय झाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा असताना शनिवारी अचानक शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत जात असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. अजित पवार यांनी स्वत:च दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय.

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

अजित पवार यांनी म्हटलं की, पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्रित सामोरे जात आहे. त्यामुळे हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. बऱ्याच जणांच्या मनात हेच होतं. त्यामुळे महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं म्हटलंय. खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी अजित पवार गटासोबत तीन बैठका केल्या. या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांची एकत्रित यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये १२५ जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. अबकी बार १२५ पार असा नारा भाजपने दिलाय. तर विरोधकांच्या फक्त ३ जागा निवडून येतील असा दावाही केला जातोय. भाजपच्या या दाव्यावर राष्ट्रवादीने सडकून टीका केलीय. भाजपला त्यांचा अति आत्मविश्वास आणि घमंड नडेल अशा शब्दात राष्ट्रवादीने सुनावलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.