नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस उरले असून सगळीकडे न्यू ईअर सेलिब्रेशनचे प्लान्स आखले जात आहेत. मात्र असतानाही देशात आणि राज्यात निसर्गाचं रुप सातत्याने बदलातना दिसत असून थंडीचा कडाका काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. किमान तापमानात बदल होत असल्याने राज्यात थंडीत चढउतार होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा अजूनही 10 अंशांच्या खाली असल्याने थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. उत्तर भारतात दाट धुक्याचे साम्राज्य असून पंजाबपासून बिहारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रातही दिसणार असून त्याचा परिणाम प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवणार आहे.
कोल्ड वेव्हचा इशारा
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत असून त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढेल, परिणामी देशातील अनेक भागांत कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्याचा थेट परिणाम जाणवला नाही तर त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमधील शीतलहरींमुळे इथलं तापमान घसरू शकतं. त्यामुळे विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात , विशेषत: नागपूर, गोंदिया आणि नाशिक जिल्ह्यात येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरण्याची शक्यत आहे. गारव्या मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने तेथील नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 2 जानेवारीपर्यंत गारठा कायम राहू शकतो. परभणी, धुळे, अहिल्यानगर आणि निफाडसारख्या अनेक या भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत असले तरी आणखी काही दिवस तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी टिकून राहण्याचा अंदाज आहे, जानेवारीतही हीच परिस्थिती दिसेल.
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित
दरम्यान मुंबईकरांसाठी एक खराब बातमी आहे. मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाली असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक 277 वर म्हणजे वाईट श्रेणीत पोहोचला आहे. वडाळा, कुर्ला , बांद्रा , गोवंडी, परळ, बोरिवली, मालाड , दादर आणि कुलाबा यांसारख्या ठिकाणी प्रदूषण अतिशय जास्त आहे. खराब हवेमुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढू शकतं.
PM2.5 (पार्टिक्युलेट मॅटर) आणि PM10 हे प्रमुख प्रदूषकांचं प्रमाण मुंबईतील हवेत वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनांची वाढती संख्या, हवामानातील बदल आणि इतर स्थानिक कारणे यामुळे प्रदूषण पातळी जास्त आहे. या घटकांमुळे ज्यामुळे PM2.5 आणि PM10 सारखे कण हवेत जमा होत असून आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलं आणि श्वसनाचे त्रास असलेल्यांसाठी, घराबाहेर जाणे टाळणे किंवा मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.