पोलादपूर तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
वर्षभरात २७६ जणांना कुत्र्याचा चावा; सर्पदंशासह विंचूदंशाच्या घटनांतही वाढ
पोलादपूर, ता. २८ (बातमीदार) : पोलादपूर तालुक्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या एका वर्षात एकूण २७६ नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या असून, तरीही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी कार्यवाही होताना दिसून येत नाही.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात २४१, पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३३, तर पळचिल आरोग्य केंद्रात दोन जणांना कुत्रा चावल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. याच कालावधीत विंचूदंशाच्या २२९, तर सर्पदंशाच्या ५९ घटना ग्रामीण रुग्णालयात नोंद झाल्याने तालुक्यातील आरोग्य सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेबीज हा आजार वैद्यकीयदृष्ट्या शंभर टक्के टाळता येण्याजोगा असला, तरी भारतात आजही तो हजारो लोकांचा जीव घेत आहे. या आजाराचा सर्वाधिक फटका ग्रामीण भाग, गरीब कुटुंबे व शहरी झोपडपट्ट्यांतील नागरिकांना बसत आहे. अपुरी आरोग्यसेवा, माहितीचा अभाव, तसेच महागडे उपचार यामुळे रेबीज ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित संख्या ही रेबीज नियंत्रणातील सर्वात मोठी अडचण मानली जात आहे. कुत्र्यांचे नसबंदी व लसीकरण कार्यक्रम अपुरे ठरत असल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रित होत नाही, परिणामी मानवी रेबीजच्या घटनांचा धोका वाढतो. केंद्र सरकारने नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्रामअंतर्गत विविध उपाययोजना सुरू केल्या असून, तज्ज्ञांच्या मते कुत्र्यांच्या किमान ७० टक्के लोकसंख्येचे नियमित लसीकरण झाले तर रेबीजचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो; मात्र हे उद्दिष्ट प्रत्यक्षात गाठण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
..............
महागडा उपचार
रेबीज उपचार केवळ जीवघेणेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही महागडे आहेत. कुत्र्याच्या चाव्यानंतर रेबीज प्रतिबंधक लसींचा पूर्ण कोर्स आणि काही प्रकरणांत रेबीज इम्युनोग्लोब्युलिन देणे आवश्यक असते; मात्र अनेक शासकीय आरोग्य केंद्रांत या लसींचा नियमित साठा नसल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. एका रुग्णामागे १० ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने हा भार गरीब कुटुंबांसाठी मोठा ठरत आहे. वाढत्या मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, तसेच सर्व आरोग्य केंद्रांत रेबीज प्रतिबंधक लसी व आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.