रात्रभर मित्रांसोबत जोरदार पार्टी… पण पहाट होताच…शनिवार ठरला एअर होस्टेसच्या आयुष्यातील शेवटचा दिवस; काय घडलं असं?
Tv9 Marathi December 29, 2025 06:45 PM

आयुष्य हे क्षणभंगूर आहे, हे पदोपदी प्रत्येकाला जाणवत असतं. कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं असेल हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, एक 22 वर्षाची तरुणी… चांगली शिकली. एअर होस्टेस झाली. गलेलठ्ठ पगार मिळाला. आता आयुष्य कसं सुखात जाईल असं तिला वाटू लागलं. सुखाची स्वप्नं पाहू लागली. पण नियतीच्या मनात भलतंच काही होतं. शनिवारचा दिवस तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. मित्राच्या घरी पार्टीला जायचं निमित्त झालं आणि आयुष्याचा खेळच आटोपला. काय झालं तिच्याबाबत असं?

दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये एका एअर होस्टेसचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. सिमरन डडवाल असं या 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती एअर होस्टेस होती. ती मूळची पंजाबच्या मोहालीची राहणारी आहे. एअर इंडियात ती काम करत होती. दिल्लीतच राहत होती. शनिवारी सिमरन तिच्या मित्राच्या फ्लॅटवर गेली होती. तिथे तिने मित्रांसोबत जोरदार पार्टी केली. पण अचानक तिची तब्येत बिघडली. मित्रांनी सिमरनने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचे मित्र चांगलेच हादरून गेले असून तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डीएलएफ फेज-1 मधील हे प्रकरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सिमरनचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमला पाठवला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियात काम करण्यापूर्वी सिमरन विस्तारा एअरलाइन्समध्ये काम करत होती. तिथे तिने दोन वर्ष काम केलं होतं.

मित्रांसोबत पार्टी

शनिवारी रात्री सिमरन तिची मैत्रीण नीतिकाच्या फ्लॅटवर गेली होती. नीतिका डीएलएफ फेज-1 मध्ये भाड्याने राहते. नीतिकाही एअर होस्टेस आहे. त्यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. नीतिकाच्या घरी त्यांचे इतर मित्रही आले होते. सर्वांनी मिळून रात्रभर पार्टी केली. पहाटे 5 वाजेच्या सुमारास सिमरनला अचानक श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या मित्रांनी तिला आर्टिमिस रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

सँपल लॅबमध्ये

दरम्यान, सिमरनच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्रांचे जबाब नोंदवले आहेत. नीतिकाच्या घरी सिमरन आल्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत काय काय घडलं याची माहिती घेत आहे. पोलिसांनी पार्टीमधील पदार्थ आणि पेयाचे सँपल जप्त केले असून लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर सिमरनच्या मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, सिमरनच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी गुरुग्रामध्ये धाव घेतली आहे. सिमरनच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.