VHT : शार्दूलच्या नेतृत्वात मुंबईची विजयी हॅटट्रिक, छत्तीसगडचा 9 विकेट्सने धुव्वा
GH News December 29, 2025 07:11 PM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत मुंबईने आपला विजयी तडाखा कायम ठेवला आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात विजयी हॅटट्रिक केली आहे. मुंबई क्रिकेट टीमने देशांतर्गत क्रिकेटमधीलया प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिक्कीम, उत्तराखंडनंतर सोमवारी 29 डिसेंबरला छत्तीसगडवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने या विजयासह सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी अंगकृष रघुवंशी आणि सिद्धेश लाड या चौघांनी मुंबईच्या विजयात प्रमुख योगदान दिलं.

मुंबईचा एकतर्फी विजय

छत्तीसगडने मुंबईसमोर 143 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 156 चेंडूआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. मुंबईने 26 ओव्हर बाकी ठेवून 9 विकेट्सने हा सामना जिंकला. मुंबईने 144 धावा केल्या. अंगकृष रघुवंशी आणि इशान मुलचंदानी या सलामी जोडीने मुंबईसाठी 9 ओव्हरमध्ये 42 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानतंर इशान 36 बॉलमध्ये 3 फोरसह 19 रन्स केल्या आणि आऊट झाला.

मुंबईकडून दुसऱ्या विकेटसाठी शतकी आणि विजयी भागीदारी

इशाननंतर अंगकृषची साथ देण्यासाठी सिद्धेश लाड मैदानात आला. अंगकृष आणि सिद्धेश या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत मुंबईला एकतर्फी विजय मिळवून दिला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 90 बॉलमध्ये 102 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप करत मुंबईला विजयी केलं. अंगकृषने 66 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. तर सिद्धेशने 42 बॉलमध्ये नॉट आऊट 48 रन्स केल्या. छत्तीसगडकडून हर्ष यादव याने एकमेव विकेट मिळवली.

शम्स मुलानी-शार्दूल ठाकुरची कडक बॉलिंग, मुंबईकडून छत्तीसगडचं पॅकअप

दरम्यान त्याआधी कॅप्टन शार्दूलने टॉस जिंकून छत्तीसगडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शार्दूल ठाकुर आणि शम्स मुलानी या जोडीने छत्तीसगडला 38.1 ओव्हरमध्ये 142 रन्सवर गुंडाळलं. छत्तीसगडच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र कॅप्टन अमनदीप खरे आणि अजय मंडल या जोडीने केलेल्या खेळीमुळे छत्तीसगडला 142 धावांपर्यंत मजल मारता आली.

अमनदीप खरेची अर्धशतकी खेळी

छत्तीसगडसाठी अमनदीप याने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर अजयने 67 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. मुंबईकडून शम्स मुलानी याने 9.1 ओव्हरमध्ये अवघ्या 31 रन्स देत सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. शार्दूलने 5 पैकी 1 षटक निर्धाव टाकली. शार्दूलने 13 धावांच्या मोबदल्यात छत्तीसगडला 4 झटके दिले. तर मुशीर खान याने 1 विकेट मिळवत शार्दूल आणि शम्स या दोघांना चांगली साथ दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.