Satara News: सलग सुट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्वर हाऊसफुल्ल! पसरणी घाटात वाहनांच्या रांगा, हुल्लडबाजीमुळे वाहतूक कोंडी..
esakal December 29, 2025 09:46 PM

भिलार : ख्रिसमस आणि शनिवार-रविवार अशा सलग आलेल्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी पाचगणी आणि महाबळेश्वरकडे मोठी धाव घेतली आहे. यामुळे वाई-पाचगणी आणि महाबळेश्वर मार्गावर आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. विलोभनीय निसर्ग पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सध्या तासन् तास घाटातच घालवावे लागत असून, पसरणी घाटात वाहनांच्या ४ ते ६ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

मुंबई, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढल्याने रस्ते अपुरे पडू लागले आहेत. वाईकडून पाचगणीकडे येणाऱ्या पसरणी घाटात सकाळी नऊ वाजेपासूनच वाहने संथ गतीने सरकत होती. दुपारी ही परिस्थिती अधिकच बिकट झाली. पाचगणीतील दांडेघर नाका आणि महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात पर्यटकांच्या गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा उरली नाही.

एकीकडे वाहतूक कोंडीने पर्यटक हैराण असताना, दुसरीकडे काहीपर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे या कोंडीत अधिकच भर पडत आहे. पाचगणी परिसरात काही तरुण हुल्लडबाजी करत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत असल्याने शिस्तबद्ध प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. बेशिस्त पार्किंग आणि ओव्हरटेकिंगच्या नादात वाहतूक पूर्णपणे ठप्प होताना दिसत आहे.

सुट्यांचा मुहूर्त साधून अनेक शाळांनी या भागात शैक्षणिक सहली काढल्या आहेत. मात्र, या महाभयंकर वाहतूक कोंडीत शालेय बस अडकून पडल्याने लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. खाण्यापिण्याची आबाळ आणि तासन् तास एकाच जागी बसून राहावे लागल्याने विद्यार्थ्यांचा पुढील प्रवास अत्यंत खडतर झाला आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी पोलिस आणि होमगार्डस कडाक्याच्या थंडीत आणि उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, वाहनांचा ओघ इतका प्रचंड आहे, की पोलिसांचीही मोठी दमछाक होत आहे. पर्यटकांनी संयम ठेवावा, विनाकारण ओव्हरटेकिंग करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

आम्ही सकाळी ९ वाजता पुण्याहून निघालो होतो, पण पाचगणी घाट चढायलाच दुपार उलटली. घाटात दोन तास गाडी जागेवर उभी होती. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलो होतो; पण अर्धा दिवस फक्त वाहतूक कोंडीतच गेला.

- एक पर्यटक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.