कोल्हापूर : उच्च-भ्रू, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य असे संमिश्र मतदार असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरामधून महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकला आहे.
त्यातील प्रत्येकजण स्वतःला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहे. महायुती असो की, महाविकास आघाडी या प्रभागातील इच्छुकांचे समाधान करू शकणार नाही. त्यामुळे उमेदवारी नाकारलेले इच्छुक बंडाचे निशाण फडकविणार असल्याचे वास्तव आहे. असे बंडखोर मात्र, युती आणि आघाडीच्या नेते, उमेदवारांच्या जीवाला घोर लावणार हे निश्चित आहे.
- संतोष मिठारी
पूर्वीच्या साईक्स एक्स्टेंशन, टाकाळा खण-माळी कॉलनी, राजारामपुरी, तवनाप्पा पाटणे हायस्कूल या चार प्रभागांचा एकत्रित मिळून आता प्रभाग क्रमांक पंधरा तयार झाला आहे. उच्च-भ्रू, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य अशा संमिश्र मतदारांचा या प्रभागामध्ये समावेश आहे.
मागील निवडणुकीत टाकाळा खण-माळी कॉलनीमध्ये भाजप, साईक्स एक्स्टेंशन येथे कॉंग्रेस, राजारामपुरीत राष्ट्रवादी आणि तवनाप्पा पाटणे हायस्कूल परिसरातून शिवसेनेने विजयाचा झेंडा रोवला होता.
Kolhapur Municipal : ‘कट्टर शिवसैनिक आहे, उमेदवारी द्या’ ठाकरे सेनेतील इच्छुकांची मुलाखतीत ठाम भूमिकात्यानंतर पुढे कोरोना, आरक्षण, प्रभाग निश्चिती अशा काही कारणांमुळे महापालिकेच्या निवडणुका होतील या प्रतीक्षेत दहा वर्षे सरली. निवडणुका झाल्या नसल्या, तरी इच्छुकांची तयारी मात्र आपआपल्यापरीने सुरू होती. या कालावधीत वर्षागणिक इच्छुकांची संख्या वाढत गेली.
आता शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांकडे या प्रभागातील प्रत्येकी एका जागेसाठी किमान सहा ते सातजण इच्छुक आहेत.
त्यांनी उमेदवारीसाठी पक्षातील आपआपल्या नेत्यांकडे साकडे घातले आहे. त्याबाबतचा निर्णयाची वाट न बघता या इच्छुकांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. कॉंग्रेसने या प्रभागातील एका उमेदवाराची घोषणा केली आहे. उर्वरित पक्षांचा निर्णय अद्याप झालेला नाही. गेल्या आठ-दहा वर्षांत आपल्या परिसरात विविध माध्यमातून संपर्क आणि सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत डावलल्यास त्याचा फटका पक्षांना निश्चितपणे बसणार आहे.
पक्षाने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष अथवा आप-वंचित बहुजन-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या तिसऱ्या आघाडीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय काही इच्छुकांनी घेतला आहे. अशा स्वरूपातील इच्छुकांचे बंड कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या नेते, उमेदवारांना थंड करावे लागणार आहे; अन्यथा विजयापर्यंत पोहोचण्याची त्यांची वाट खडतर होणार असल्याचे वास्तव आहे.
व्यापारी-व्यावसायिक, नोकरदार, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, कष्टकऱ्यांची वस्ती असलेल्या या प्रभागात निव्वळ एका ठरावीक परिसरातील असलेला संपर्क महायुती असो की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फारसा उपयोगी ठरणार नाही. त्यांना आपल्या आघाडी आणि युतीतील इतर तिन्ही उमेदवारांची मदत घेणे आणि त्यांनीही सहकार्य करणारे आवश्यक ठरणार आहे. सध्या युतीच्या इच्छुकांकडून प्रभागातील रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधांसाठी आणलेल्या निधी, भविष्यातील नियोजनाच्या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. आघाडीच्या इच्छुकांकडून यापूर्वी केलेल्या कामांचा दाखला, आगामी ‘व्हिजन’ मांडत प्रचार केला जात आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या प्रभागातील लढतीमध्ये चुरस रंगणार आहे.
प्रभागाची व्याप्तीअ-अनुसूचित जाती
ब-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
क-सर्वसाधारण (महिला)
ड-सर्वसाधारण
विकासाचे मुद्दे
सीबीएस स्टँड ते राजारामपुरी रेल्वे फाटक असा
व्यापारी पेठांमधील पार्किंगचे नियोजन हवे
अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागावा
मुख्य, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे
प्रॉपर्टी कार्डचा प्रलंबित प्रश्न सुटावा
पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याची गरज
गटारी, ड्रेनेज लाईन आणि नियमित कचरा उठावाच्या नियोजनाची आवश्यकता
इच्छुक असे...प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, पूनम फडतरे, मुरलीधर जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, अभिजित शिंदे, राजदीप भोसले, दीपाली जाधव, असिया सनदी, जस्मिन मुजावर, मीना मोरे, वैशाली पसारे, संतोषी भालकर, प्रशांत अवघडे, विघ्नेश आरते, अमित कदम, विजय सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस, अमर निंबाळकर, रोहित कवाळे.