14195
डंपर सुसाट; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
देवगड-निपाणी मार्गावरील बेफामपणा; वेळीच लगाम घालण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २९ ः देवगड-निपाणी मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी असलेले डंपर चालक फेऱ्या जास्त मारण्याच्या नादात बेदरकारपणे डंपर चालवत आहेत. यामुळे काही अपघात घडले आहेत. भविष्यात मोठे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी डंपरच्या वेगाला ठेकेदार कंपनीने वेळीच लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या देवगड-निपाणी मार्गावर रस्ताकाम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदार कंपनीकडून अनेक डंपरची या मार्गावर वाहतूक सुरू असते; मात्र आपल्या फेऱ्या जास्त कशा बसतील, या नादात डंपरचालक बेदरकारपणे वाहन चालवत आहेत. यामुळे इतर वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याच मार्गावर तोंडवलीपासून देवगडपर्यंत अनेक जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल रस्त्याच्या लगत आहेत.
अशा डंपर चालकांच्या वेगाला वेळीच आळा न बसल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. भरधाव डंपरमुळे काही छोटेमोठे अपघात घडले; मात्र मोठे अपघात होऊ नये, यासाठी ठेकेदार कंपनीने वेळीच लगाम घातला पाहिजे. यासाठी ठेकेदार कंपनीने वेळीच आपल्या वाहनचालकांना योग्य त्या सूचना देऊन वेगावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.
........................
कोट
सध्या सुरू असलेल्या रस्ताकामामुळे रस्ता अनेक ठिकाणी खोदलेला आहे. अशावेळी डंपरचालक ज्या प्रकारे वाहन चालवत आहेत, ते नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.
- संदीप पाटील, तोंडवली
........................
देवगड-निपाणी मार्गावर रस्ताकाम सुरू आहे. वाहनांची वर्दळ वाढली आहे. अशावेळी खडी, वाळू व इतर कामांसाठी फिरणारे डंपरचालक बेफिकीरपणे वाहन चावलत आहेत. यावर ठेकेदार कंपनीने वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- संजय इंदप, कोळोशी