भारत आणि श्रीलंका महिला टी२० मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व राखले आहे.
शफाली वर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत ४ स्थानांची उडी घेत सहावा क्रमांक मिळवला आहे.
रेणुका सिंग ठाकूरने गोलंदाजांच्या यादीत ८ स्थानांची उडी घेत सहावे स्थान मिळवले आहे.
भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सध्या टी२० मालिका सुरू असून या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व ठेवताना पहिले चार सामने जिंकले आहेत. अशात आता मंगळवारी (३० डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) ताजी टी२० क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
या ताज्या क्रमवारीनुसार शफली वर्माने (Shafali Verma) मोठे झेप घेतली आहे. तिच्यासह रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी यांनीही फायदा झाला आहे.
ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियन खेळाडूला धक्का; पण स्मृती मानधनाने गमावला ताजमहिला टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत (Women's T20I Rankings) २१ वर्षीय शफाली वर्माने ४ स्थानांनी उडी घेत आता सहावा क्रमांक मिळवला आहे. शफाली यापूर्वी २०२० मध्ये अव्वल क्रमांकावरही होती. ती अव्वल क्रमांक मिळवणारी मिताली राजनंतरची दुसरीच भारतीय महिला क्रिकेटपटू होती. मात्र नंतर तिला संघातील स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
दरम्यान, तिने काही दिवसांपूर्वीच भारतासाठी पुनरागमन केले. ती गेल्या काही दिवसांपासून दमदार फॉर्ममध्येही आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेत सलग तीन अर्धशतके केली आहेत. त्यामुळे ती आता पहिल्या १० फलंदाजामध्ये आली आहे. तिचे अव्वल क्रमांकावर असलेल्या बेथ मुनीपेक्षा फक्त ५८ रेटिंग पाँइंट्स कमी आहेत. मुनी ७९४ रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. शफालीचे ७३६ रेटिंग पाँइंट्स आहेत.
या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर ७७४ रेटिंग पाँइंटसह हेली मॅथ्यूज आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारताची स्मृती मानधना कायम आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या टी२०मध्ये ८० धावांची खेळी केली होती. यादरम्यान तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावाही पूर्ण केल्या होत्या. तिचे ७६७ रेटिंग पाँइंट्स आहेत.
त्यापाठोपाठ ताहलिया मॅकग्रा (७५७ रेटिंग) आणि लॉरा वुल्फार्ट (७४४ रेटिंग) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या १० फलंदाजामध्ये भारताच्या शफाली आणि स्मृती या दोनच क्रिकेटपटू आहेत.
दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष हिनेही मोठी झेप घेतली आहे. तिने ७ स्थानांची उडी घेत २० वे स्थान मिळवले आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या टी२०मध्ये नाबाद ४० धावांची आक्रमक खेळी केली होती.
महिला टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची रेणुका सिंग ठाकूरने ८ स्थानांची उडी घेत आता सहावे स्थान मिळवले आहे. ती दक्षिण आफ्रिकेच्या नॉनकुलुलेको एमलाबासह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहे. तिने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या होत्या.
याशिवाय डावखुरी फिरकीपटू श्री चरणी हिनेही श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तिने तब्बल १७ स्थानांची गरुडझेप घेतली असून ती आता ५२ व्या क्रमांकावर पोहचली आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा अव्वल क्रमांकावर कायम आहे.
ICC T20 Rankings : भारताचा 'T-20' मधील दबदबा कायम! ; 'ICC Ranking'मध्ये 'टीम इंडिया'च अव्वलतसेच रेणूकाही आता टॉप-१० मध्ये आली आहे. त्यामुळे टॉप-१० गोलंदाजांमध्ये दीप्ती आणि रेणुका दोघी भारतीय आहेत. या यादीत दीप्तीपाठोपाठ ऍनाबेल सदरलँड, सादिया इक्बाल, सोफी इक्लेस्टोन आणि लॉरेन बेल अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
टी२० क्रमवारीत अष्टपैलू महिला खेळाडूंमध्ये फारसा बदल झालेला नाही. या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजची हेली मॅथ्युज कायम असून दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची एमेलिया केर आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताची दीप्ती शर्मा कायम आहे.