उल्हासनगरात टीओकेचे अस्तित्व संपुष्टात
esakal December 31, 2025 11:45 AM

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : कलानी घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या टीओके (टीम ओमी कलानी)ला अखेर आपली स्वतंत्र ओळख सोडून शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. एकेकाळी ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेला टीओके आज स्वतःचा झेंडा खाली ठेवत दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्यास भाग पडल्याने, उल्हासनगरच्या सत्ताकारणात ऐतिहासिक उलथापालथ घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जाहीर झालेल्या निर्णयाने शहरातील राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. टीओके आता शिवसेना शिंदे गट यांच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावरच निवडणूक लढवणार, हे स्पष्ट झाले. टीओके कोअर कमिटीचे प्रमुख जमनू पुरसवानी यांनी सांगितले, मुंबईत शिंदे गट आणि टीओके यांच्यात झालेल्या निर्णायक बैठकीत जागावाटपावर अंतिम सहमती झाली आहे. त्यानुसार शिंदे गट ३५ जागा, टीओके (धनुष्यबाण चिन्हावर) ३२ जागा, साई पक्ष ११ जागा अशा एकूण ६७ जागांवर उमेदवार मैदानात उतरतील. तर साई पक्ष आपले उमेदवार स्वतंत्रपणे लढवेल.
नव्या सत्तासमीकरणांमुळे उल्हासनगर महापालिका निवडणूक आता केवळ सत्ता मिळवण्याची लढाई न राहता, कोण टिकणार आणि कोण इतिहासजमा होणार? याचा थेट निर्णय होणार आहे. धनुष्यबाणाच्या छत्राखाली उतरलेला टीओके जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करणार, की हा निर्णयच कलानी राजकारणाचा अखेरचा अध्याय ठरणार? याकडे आता संपूर्ण उल्हासनगरचे लक्ष लागून राहिले आहे.

विलिनीकरण की राजकीय शरणागती?
टीओकेचे शिवसेनेत विलिनीकरण झाले आहे का? या प्रश्नावर कोणत्याही नेत्याने थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र, स्वतःच्या नावाने किंवा चिन्हावर निवडणूक न लढवता दुसऱ्या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढणे, यालाच राजकीय जाणकार ‘स्वतंत्र अस्तित्वाचा शेवट’ मानत आहेत.

कलानी घराण्याचा प्रभाव संपुष्टात?
दशकानुदशके उल्हासनगरच्या सत्ताकारणात प्रभाव राखणारे कलानी कुटुंब आज पहिल्यांदाच स्वतःच्या राजकीय ब्रँडशिवाय निवडणुकीला सामोरे जात आहे. ही केवळ युती नाही, तर टीओकेसाठी राजकीय अपरिहार्यता असल्याचे चित्र आहे. बदललेली मतदार मानसिकता, वाढती स्पर्धा आणि नव्या राजकीय शक्तींचा उदय या सगळ्यांनी कलानी राजकारणाचा किल्ला ढासळल्याचे संकेत मिळत आहेत.


उल्हासनगर : जागावाटपावर शिंदे गट आणि टीओके यांच्यात मुंबईत बैठक झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.