प्रिय कार्यकर्त्यांनो,
गेल्या काही दिवसात जे घडलं, बघायला मिळालं; ते बघून एकच प्रश्न पडला... कार्यकर्त्यांनो जिरली का? मागील ४८ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो तमाशा झाला, तो त्यात भाग घेऊन, पाहून तुम्हीही थकला असाल ना? तुमचा नेता सकाळी ठाकरे सेनेत असतो, दुपारी भाजपकडून तिकीट मिळते. रात्री शिंदेंच्या शिवसेनेत असतो, सकाळी भाजपमधून उमेदवारी अर्ज भरलेला असतो. सत्ताधारी महायुती असो की विरोधी महाविकास आघाडी, सगळे एकसारखेच असल्याची स्थिती झाली. यालाच तर हमाम में सब नंगे म्हणतात. महापालिका निवडणुकीत कोण कुणाबरोबर लढतोय अन् कोण कुणाच्या विरोधात लढतोय, हे तुम्हाला तरी समजलेय का? प्रत्येक शहरात अन् वॉर्डात गणित बदलल्याचे चित्र आहे. कारण आघाड्या युत्याचा काही नेम नाय. राज्याच्या राजकारणात हे सगळे काय चालले आहे? कोण सत्तेत, कोण विरोधात, काही समजत नाही. म्हणूनच ओरडून विचारावं वाटतं, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...?
कुणी २० वर्षे, कुणी ४० वर्षे पक्षासाठी वाहून घेतलं, पण तिकिट कुणाला मिळाले तर उपऱ्यांना. कुठे सत्ताधारी अन् विरोधकांची युती आहे.. तर कुठे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवारच दिला नाही. दिला पण कमकुवत.. जसं दोघांची आतून सेटिंग आहे. पण मग शेवटी प्रश्न पडतो सगळे युती-आघाडीत मग्न, विरोधक कोण? कार्यकर्त्यांचं काय चुकलं... त्यांचा नेताच कुण्या एका पक्षात राहात नाही. आजचा नेता खोबरं तिकडे चांगभलं म्हणत पक्षांतर करतोय अन् तुम्ही त्यांच्या मागे सतरंज्या उचलायला जाता. पण आता तरी शहाणे व्हा.
तुमच्या नेत्यांना कधी खडसावून प्रश्न केलात का? नेत्यासाठी रस्त्यावर उतरता, पण तुमच्या पोरा-बाळाच्या भविष्याचं काय? राज्यात नोकऱ्या कुठे आहेत? महागाई नियंत्रणात कधी आणणार? सत्तेच्या लोभात पक्ष बदलता, पण कार्यकर्त्याचे काय? धर्म आणि जातीच्या नावाने तुम्हाला विभागलं जातं. महात्मा गांधींनी तत्त्वरहित राजकारणाचा धडा दिला. पण नितीन गडकरीच म्हणतातच, "आज राजकारणात तत्त्वे राहिली नाहीत, संधीसाधूपणा आला आहे. कोण कधी कोणत्या पक्षात जाईल, सांगता येत नाही." त्यामुळेच कार्यकर्त्यांनो, आता तरी जागे व्हा! तुम्ही फक्त नेत्यांच्या मागे फिरणार अन् कार्यक्रमात सतरंज्या उचलणार का? नेता मोठा होतो, पण तुम्ही फक्त दारू अन् चिकनवर धन्यता मानता. धर्म-जातीच्या जाळ्यात अडकू नका. राजकीय चिखलातून बाहेर आला तरच महाराष्ट्र सुधारेल. अन्यथा हा तमाशा चालूच राहील.
तुमचा हितचिंतक,
एक सामान्य नागरिक