रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर…! आर अश्विनने व्यक्त केली भीती
admin January 02, 2026 12:24 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पर्व सुरु झालं. या दोघांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. विराट कोहली आणि रोहित शर्माने टी20 आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे फॉर्मेट खेळतात. या दोघांची क्रेझ मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांवरून दिसून येते. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत रोहित शर्माला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे या दोघांची लोकप्रियता दिसून येते. असं असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वनडे क्रिकेटला रामराम ठोकला तर वनडे क्रिकेटचं काय होईल? असा प्रश्न माजी क्रिकेटपटू आर अश्विनला पडला आहे. टी20 क्रिकेटची क्रेझ आणि वनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असल्याने त्याने ही चिंता व्यक्त केली आहे. मागच्या काही वर्षात वनडे क्रिकेटची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

आर अश्विनने सांगितलं की, ‘मी 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर या फॉर्मेटच्या भविष्याबाबत काहीच सांगू शकत नाही. मला या फॉर्मेटबाबत चिंता वाटत आहे.अर्थात, मी विजय हजारे ट्रॉफीकडे त्याच प्रकारे पाहत आहे आणि त्याचे अनुसरण करत आहे.परंतु सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी मी जसे करत होतो तसे करण्यात मला अडचणी येत आहेत. मला वाटतं की, कसोटी क्रिकेट आपली छाप कायम ठेवेल. पण वनडे क्रिकेट भविष्याबाबत काहीच सांगता येत नाही. आम्हाला विचार करावा लागेल की अखेर प्रेक्षकांना काय पाहायचं आहे. रोहित आणि विराटमुळे लोकं विजय हजारे ट्रॉफीही पाहायला लागले आहेत.’

भारतात वनडे क्रिकेट सामन्यांची संख्या कमी झाल्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विजय हजारे ट्रॉफीत खेळावं लागलं. दुसरीकडे, वनडे संघात स्थान मिळवायचं असेल तर या फॉर्मेटपासून दूर राहून चालणार नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विजय हजारे देशांतर्गत ट्रॉफी खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. दोघांनी विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे या दोघांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड होणार यात काही शंका नाही. 11 जानेवारीला न्यूझीलंडविरूद्ध पहिला वनडे सामना होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.