भोकरदन : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने उपोषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी बुधवारी (ता.३१)भोकरदन शहरात केला. बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी आठ दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या समर्थनार्थ सरपंच मंगेश साबळे यांनी डफडे वाजवत तहसीलदारांच्या दालनात आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने थेट सरपंचांसह १३ जणांवर गुन्हे दाखल केल्याने शेतकरी व तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली.
या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मंगेश साबळे, नारायण लोखंडे, विकास जाधव यांच्यासह शेकडो तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीन भोकरदन येथील तहसील कार्यालयापर्यंत आक्रमक ‘जेल भरो’ आंदोलन केले. डोळ्यांवर काळी पट्टी, हात बांधून केलेल्या या आंदोलनाने प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात ठोस संदेश दिला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!शेतकरी पुत्रांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तहसील कार्यालयात निवेदन देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भोकरदनमध्ये मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडू शकते, असा ठाम इशाराही आंदोलकांनी दिला.