भारतातील रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासाच्या साधनांच्या तुलनेत सर्वात सुरक्षित मानला जातो. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. परंतु रेल्वे ज्या रुळावरून धावते, तो रेल्वेरुळ तुम्ही कधी निरखून पाहिला आहे का? या रेल्वेरुळाच्या मध्ये छोटे-छोटे दगड टाकलेले असतात. हे दगड का टाकलेले असतात यामागचे कारण आज जाणून घेऊ या....
अभियांत्रिकीच्या भाषेत या छोट्या-छोट्या दगडांना बॅलास्ट असे म्हणतात. या बॅलास्टच्या मदतीने रेल्वे रुळावरून सुरक्षितपणे धावते. रेल्वेचा अपघात होत नाही. रेल्वे रुळावर असणारे हे छोटे दगड कठोर असतात. ते गुळगुळीत नसतात.
लाकडी किंवा सिमेंटच्या ब्लॉकवर रेल्वे रुळ अंथरला जातो. हेच ब्लॉक घट्ट राहावेत. त्यांची जागा बदलू नये म्हणून रुळाच्या खाली बॅलास्ट टाकले जातात. जेव्हा हजारो टन वजन असलेली रेल्वे या रुळावरून जाते तेव्हा बॅलास्टमुळेच ब्लॉक त्यांच्या जागेवर स्थिर राहतात.
रेल्वे वेगाने जाते तेव्हा ब्लॉकवर बल आणि वजन दोन्हीही ब्लॉकवर पडते. अशा स्थितीत ब्लॉकचे नुकसान होऊ नये म्हणूनही बॅलास्ट खूप मदतीला येतात. पावसाचे पाणी रेल्वे रुळाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या पाण्याचा जमिनीत लवकरात लवकर निचरा व्हावा यासाठीदेखील हे बॅलास्ट फार उपयोगी पडतात.
बॅलास्ट फार उपयोगी असल्याने त्यांची देखभाल करणे गरचेचे असते. रेल्वेच्या वजनामुळे हे बॅलास्ट तुटतात. त्यांचा चुरा होतो. त्यामुळे वेळोवेळी ते बदलले जातात. डीप स्क्रिनिंग आणि टॅपिंग हे तंत्र वापरून जुने बॅलास्ट बदलून नवे बॅलास्ट अंथरले जातात.