क्रिकेटसाठी 2025 हे वर्ष खूपच खास ठरलं. आता 2026 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडणार याचा सुगावा आधीपासूनच लागला आहे. असं असताना या वर्षाच्या सुरूवातीला दिग्गज क्रिकेटपटू निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आहे. क्रिकेटला या वर्षाच्या सुरुवातीला रामराम ठोकणार असं म्हंटलं जात आहे. रिपोर्टनुसार, सिडनीत खेळला जाणारा एशेज कसोटी मालिकेतील पाचवा सामना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो. टेलिग्राफ स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, उस्मान ख्वाजा सिडनीत खेळल्या जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देऊ शकतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक अँड्र्यूज मॅक्डॉनल्डने सांगितलं की, ख्वाजा निवृत्तीबाबत कोणतीच माहिती नाही आणि निवडकर्त्यांनीही याबाबत काहीच सांगितलेलं नाही.
उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीची चर्चा का?एशेज कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया 8 महिन्यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीच्या बातम्यांचा जोर धरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत उस्मान ख्वाजा जवळपास 40 वर्षांचा होईल. त्याचं वय पाहता त्याला संघातून डावललं जाऊ शकतं. ऑस्ट्रेलिया निवड समिती त्याचं वय पाहून त्याला बाजूला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एशेज कसोटी मालिकेत उस्मान ख्वाजा प्लेइंग 11मध्ये आत बाहेर असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटी मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ड्रॉप केलं. तर तिसऱ्या कसोटी स्टीव्ह स्मिथच्या गैरहजेरीत संधी मिळाली. चौथ्या कसोटीतही त्याला संधी मिळाली.
उस्मान ख्वाजा आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात खेळला. यात त्याने तीन कसोटी सामन्यातील पाच डावात एक अर्धशतक ठोकलं. यात त्याने 30.60च्या सरासरीने 153 धावा केल्या. त्याची ही खेळी पाहून क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण आतापर्यंत त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या मालिकेत त्याची बॅट काही चालली नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी मालिकेत त्याची निवड होणं कठीण दिसत आहे.