राज्यभरात महापालिका निवडणुकीची धामधूम आहे. अनेकांनी महत्प्रयासाने उमेदवारी मिळवून अर्ज भरला आहे. तर काहींचं तिकीट कापल्याने त्यांना बंडखोरी करावी लागली आहे. आता या बंडोबांना थंड करण्याचं काम सर्वच पातळीवरून होत आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरातच या बंडखोऱ्या झाल्या आहेत. मात्र, नागपूरमधील बंडखोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नवऱ्याने पक्षात बंडखोरी केल्याने बायको नाराज झाली. तिने थेट नवऱ्याचं घरच सोडलं अन् माहेर गाठलं आहे. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपमधील बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरीच पाहायला मिळाला आहे. नवऱ्याने बंडखोरी केल्याने अर्चना डेहनकर घर सोडून भावाच्या घरी गेल्या आहेत. भाजपने प्रभाग 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. मनोज साबळे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. त्यामुळे भाजपने ऐनवेळी तिकीट दिले. त्यामुळे अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर हे नाराज झाले. आपल्याला तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्यांचं तिकीट कापलं गेलं.
म्हणून घर सोडलं
तिकीट कापल्याने डेहनकर प्रचंड नाराज झाले. विनायक डेहनकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे अर्चना डेहनकर या पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीत सापडल्या. त्यामुळे अर्चना डेहनकर यांनी नवऱ्याचं घर सोडायचं ठरवलं आणि घराबाहेर पडल्या. त्यांनी नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे डेहनकर आता नवऱ्याच्या विरोधातच प्रचार करताना दिसणार आहेत. 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौरपद मिळाल्याने पक्षाच्या विरोधात जाणे अर्चना डेहनकरांना अमान्य असल्यानं त्यांनी नागपुरातील भावंच घर गाठलं आहे.
दुसरी बंडखोरी, भाजपचा कस लागणार
डेहनकर यांच्या बंडखोरीची नागपुरात चर्चा असतानाच आणखी एका बंडखोरीची चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आणि सघांचे एकनिष्ठ स्वयंसेवकाच्या मुलानेही बंडखोरी केली आहे. निनाद दीक्षित यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून उमेदवारी अर्ज भरला आहे. निनाद दीक्षित यांनी प्रभाग 22 डी मधून फॅारवर्ड ब्लॅाकच्या तिकीटावर अर्ज भरला आहे. संघ मुख्यालयाच्या प्रभागात स्वयंसेवकाच्या बंडखोरीमुळे भाजपचा इथे कस लागणार आहे.