इंग्लंडने ऑस्ट्रेलियात सलग 3 सामने गमावून अवघ्या 11 दिवसात प्रतिष्ठेची एशेज सीरिज गमावली. ऑस्ट्रेलियाने त्यासह एशेज सीरिज कायम राखण्यात यश मिळवलं. त्यानंतर इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या चौथ्या आणि बॉक्सिंग डे टेस्टमध्ये जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला. इंग्लंडने यासह विजयाचं खातं उघडलं आणि सलग 3 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठा झटका दिला. ऑस्ट्रेलियाचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिला पराभव ठरला. तसेच कॅप्टन बेन स्टोक्स याने इंग्लंडची दीड दशकांची प्रतिक्षा संपवली. इंग्लंडचा हा ऑस्ट्रेलियातील 15 वर्षांनंतरचा पहिलाच कसोटी विजय ठरला.
आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 4 जानेवापीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड मालिकेतील पाचव्या सामन्यात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्नात असणार आहे. त्यासाठी इंग्लंडने 2 जानेवारीला 12 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचवा सामना जिंकून मालिका पराभवातील अंतर 2-3 असा करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे इंग्लंडच्या बॉलिंगची धार कमी झालीय. जोफ्रानंतर गस एटकिन्सन याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्याला मुकावं लागलंय.
टीम मॅनेजमेंटकडून अंतिम कसोटीसाठी 12 खेळाडूंची निवड
टीम मॅनेजमेंटने या 12 सदस्यीय संघात 3 वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या 12 पैकी 10 खेळाडू हे चौथ्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये होते. फक्त 2 खेळाडूंना नव्याने संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स याने 2024 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तर फिरकीपटू शोएब बशीर याचाही समावेश करण्यात आला आहे. शोएब बशीर याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळला होता. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर सनसनाटी विजय मिळवला होता. आता टीम मॅनेजमेंट 12 पैकी कोणत्या एकाला डच्चू देणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कॅप्टन),जॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर),विल जॅक्स, गस एटकिन्सन, जॉश टंग, मॅथ्यू पॉट्स आणि शोएब बशीर.