न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 3 जानेवारीला टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. या मालिकेत मोहम्मद सिराजचं पुनरामगन होण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याने शक्यता वाढली आहे. मोहम्मद सिराज या स्पर्धेत हैदराबाद संघाकडून मैदानात उतरणार आहे. या संघाचं नेतृत्व तिलक वर्माच्या हाती असणार आहे. सीव्ही मिलिंदच्या जागी तिलक वर्माकडे संघाची सूत्र सोपवली आहेत. तिलक वर्माच्या गैरहजेरीत त्याने संघाचं नेतृत्व सांभाळलं होतं. हा सामना 3 जानेवारीला चंदीगडविरुद्ध होणार आहे. रिपोर्टनुसार, मोहम्मद सिराज 8 जानेवारीला जम्मू काश्मीर विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज विजय हजारे ट्रॉफीत दोन सामने खेळणार असल्याने टीम इंडियात कमबॅकचे संकेत मिळत आहेत. कारण 11 जानेवारीपासून वनडे मालिका सुरु होणार आहे.
मोहम्मद सिराजने शेवटचा वनडे सामना 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला होता. यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला डावललं होतं. इतकंच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफीतही सिराजची निवड केली नव्हती. परिस्थितीचा अंदाज घेऊन सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीतून डावललं होतं. मोहम्मद सिराज विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या चार सामन्यात खेळला नव्हता. हैदराबादसाठी साखळी फेरीतील शेवटच्या तीन पैकी दोन सामन्यात खेळणार असल्याची माहिती आहे. वनडे वर्ल्डकप 2023 पर्यंत मोहम्मद सिराज संघाचा नियमित भाग होता. मात्र त्यानंतर त्याला 50 षटकांच्या फॉर्मेटमधून वगळण्यात आलं.
मोहम्मद सिराज आणि तिलक वर्मा व्यतिरिक्त आणखी तीन दिग्गज खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळणार आहेत. तामिळनाडूकडून वॉशिंग्टन सुंदर आणि वरूण चक्रवर्ती खेळणार आहेत. पंजाबकडून शुबमन गिल मैदानात उतरणार आहे. टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियातून बाहेर केल्यानंतर गिल पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पंजाब विरुद्ध सिक्किम यांच्यात होणार आहे. या सामन्यातून गिल नव्या पर्वाला सुरुवात करण्याची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. दरम्यान, शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार हे निश्चित आहे. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असणार आहेत.