‘टी20 वर्ल्डकप 2026 कोणीच पाहणार नाही..’ आयसीसीवर आर अश्विनची आगपाखड; कारणही सांगितलं
GH News January 03, 2026 01:12 AM

टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता क्रिकेटबाबत विश्लेषण आणि होणाऱ्या चुका पटलावर मांडण्याचं काम करत आहे. आता आर अश्विनने मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत आसयीसीवर टीकास्त्र सोडलं आहे. आर अश्विनच्या मते आयसीसी स्पर्धांची गरजेपेक्षा जास्त संख्या आणि संघाच्या दरम्यान वाढणारा क्वॉलिटी गॅप यामुळे प्रेक्षकांचा उत्साह कमी होताना दिसत आहे. आर अश्विनने स्पष्ट शब्दात सांगितलं की, आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रेक्षकवर्ग बांधण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण स्पर्धेच्या सुरूवातीचे सामने एकतर्फी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा रोमांच संपुष्टात येईल. कारण छोट्या आणि मोठ्या टीममधील अंतर खूपच वाढलं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यात हवं तसे सामने होणार नाही. उलटफेर होण्याची शक्यताही कमीच आहे.

आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘यावेळेस कोणीही टी20 वर्ल्डकप पाहाणार नाही. भारत विरुद्ध अमेरिका, भारत विरुद्ध नामिबिया या वर्ल्डकप सामन्यातून लोकं दूर राहणं पसंत करतील. यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनी व्हायची. त्यामुळे क्रीडारसिकांमध्ये उत्साह असायचा. तेव्हाच्या काळात भारताचा सामना इंग्लंड किंवा श्रीलंकेसारख्या मजबूत संघांशी व्हायचा. ते सामने पाहण्याची मजा काही औरच होती. ‘ इतकंच काय तर आर अश्विनने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरवर्षी काही ना काही मोठी आयसीसी स्पर्धा होत असल्याने वर्ल्डकपसारखी स्पर्धा आपली ओळख गमवत आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी निम्म्या संघांची क्षमता फक्त साखळी फेरीत खेळण्याची आहे. दरम्यान 2010 पासून दरवर्षी काही ना काही स्पर्धा होत आहे. 2020 टी20 वर्ल्डकप कोविडमुळे 2021 झाला. त्यानंतर 2022 मध्ये टी20 वर्ल्डकप, 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप, 2024 टी20 वर्ल्डकप, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता 2026 ला टी20 वर्ल्डकप होत आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. महिनाभर ही स्पर्धा असणार आहे. त्यानंतर 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.