व्हेनेझुएला : तेलावर उभं राहिलेलं राष्ट्र आज संकटात, व्हेनेझुएलाच्या घसरणीमागची कारणं कोणती?
BBC Marathi January 07, 2026 10:45 AM
Getty Images 2016 मध्ये भारतातील सरकारी कंपनी ओएनजीसीच्या तत्कालिन एमडींसह व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो.

भारताची सरकारी मालकीची तेल कंपनी ओएनजीसीनं 2005 मध्ये जगातील सर्वाधिक तेलाचे साठे असलेल्या व्हेनेझुएला देशाच्या सरकारी मालकीची तेल कंपनी 'पेट्रोलिओस डी व्हेनेझुएला' (पीडीव्हीएसए) बरोबर एक करार केला होता.

त्यावेळी भारतासोबत करार करताना, व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष ह्युगो चावेझ यांनी, "त्यांच्या देशाला अमेरिकन बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करायची इच्छा आहे", असं म्हटलं होतं.

व्हेनेझुएलाच्या इतिहासात निकोलस मादुरो हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये 21 शतकातील सर्वाधिक करिश्मा असलेले नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चावेझ यांची जागा घेतली.

व्हेनेझुएलाकडं फक्त तेलाचे साठेच नाहीत, तर असं बरंच काही आहे ज्यामुळं हा देश दक्षिण अमेरिकेतील महत्त्वाचा भाग ठरला.

या भागात सर्वाधिक शहरीकरण झालेल्या देशांपैकी व्हेनेझुएला एक आहे.

व्हेनेझुएलातील तेल साठे

व्हेनेझुएलाची राजधानी काराकसचं क्षेत्रफख 91,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर देशाची लोकसंख्या 3 कोटींहून अधिक आहे. इथं बोलली जाणारी मुख्य भाषा स्पॅनिश असून काही प्रादेशिक भाषाही प्रचलित आहेत.

ट्रम्प प्रशासन दीर्घ काळापासून आपल्याला सत्तेवरून हटवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मादुरो यांनी अनेकदा केला आहे. व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांवर अमेरिकेला नियंत्रण हवं आहे, हे त्यामागचं कारण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे असे आरोप होत असतील तर व्हेनेझुएलाचा तेलसाठा किती मोठा आहे? असा प्रश्नही उपस्थित होतो.

Getty Images व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वाधिक तेलाचा साठा आहे.

तर व्हेनेझुएलामध्ये अंदाजे 300 अब्ज बॅरलपेक्षा जास्त तेलाचे साठे आहेत. ते जगातील कोणत्याही देशाच्या तेल साठ्यांपेक्षा जास्त आहे.

या साठ्यांमध्ये प्रामुख्यानं खूप जड (घनता) असं कच्चं तेल आहे. ते काढण्याची प्रक्रिया महाग आणि कठीण आहे. तरीही व्हेनेझुएला जगात पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA) नुसार, व्हेनेझुएलाने 2023 मध्ये जगातील एकूण कच्च्या तेलाच्या फक्त 0.8 % उत्पादन केले.

सध्या, व्हेनेझुएला दररोज सुमारे 9 लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो. चीन त्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

खनिज संपत्ती

तेलाशिवाय व्हेनेझुएला हा देश खनिज संपत्तीनंही समृद्ध आहे. कराकासमधील भारतीय दूतावासानं 2016 मध्ये व्हेनेझुएलातील खाण क्षेत्राशी संबंधित एक सर्वेक्षण केलं होतं.

त्या सर्वेक्षणानुसार, व्हेनेझुएलामध्ये कोळशाबरोबरच स्टील, अॅल्युमिनियम, निकेल, मॅगनिज, तांबे, जस्त अशा खनिजांचे साठे आहेत.

तसंच व्हेनेझुएलामध्ये 12 हजार दशलक्ष टन लोहखनिजाचा साठा असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं होतं.

व्हेनेझुएलातील कॅलाओ गाव पारंपरिकपणे सोन्याच्या खाणींचं एक प्रमुख केंद्र राहिले आहे. देशात अंदाजे 40 लाख टन एवढ्या सोन्याचे साठे आहेत.

तसंच इथं 6 कोटी टन अॅल्युमिनियम धातू (बॉक्साइट)चा साठा आहे.

Getty Images व्हेनेझुएलाचा आयरन माऊंटन. (संग्रहित)

धातूंशिवाय इतर खनिजांबद्दल बोलायचं झाल्यास व्हेनेझुएलामध्ये 10 अब्ज मेट्रिक टन कोळशाचे साठेही असल्याचा अंदाज आहे.

व्हेनेझुएलाचे मुख्य पिक हे कॉफी आहे. तसंच इथं मका आणि तांदूळही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. इथं उत्तरेकडील पर्वत आणि खालच्या भागात प्रामुख्यानं शेती केली जाते.

21 व्या शतकाच्या सुरुवातीला व्हेनेझुएलामध्ये कमकुवत आर्थिक व्यवस्थापन पाहायला मिळालं. देशात प्रचंड महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, बेरोजगारी आणि गुन्हेगारी यासारख्या समस्या होत्या. त्यामुळं व्हेनेझुएलातील सुमारे 70 लाख लोकांनी शेजारच्या देशांमध्ये पलायन केलं आहे.

वाद आणि व्हेनेझुएलाचे संकट

ट्रम्प प्रशासनानं व्हेनेझुएलातून अमेरिकेत येणाऱ्या लाखो स्थलांतरितांसाठी मादुरो यांना जबाबदार ठरवलं आहे.

पनामा आणि कोलंबियामधील पर्वत आणि पर्जन्यवनांतून जाणारा 100 किलोमीटर लांबीचा रस्ता 'डॅरियन गॅप' म्हणून ओळखला जातो. मध्य आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे. स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी हा जगातील सर्वात धोकादायक मार्ग समजला जातो.

अलिकडच्या काळात व्हेनेझुएलाच्या निर्वासितांनी मोठ्या संख्येने हा धोका पत्करला. त्यामुळं व्हेनेझुएलाच्या निर्वासितांचं संकट हे जगातील सर्वात मोठ्या निर्वासित संकटांपैकी एक ठरलं.

व्हेनेझुएलाचे नेते आणि अमेरिकेतील शत्रुत्व हेही खूप जुनं आहे. मादुरो यांचे मार्गदर्शक ह्यूगो चावेझ यांनी अनेकदा अमेरिकेवर त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

माजी राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ हे व्हेनेझुएलाच्या सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. 2013 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी 14 वर्षांच्या कारकीर्दीचं वर्णन करताना स्वतःला 'गरिबांचा तारणहार' म्हटलं होतं.

व्हेनेझुएलाच्या तेल उत्पन्नातून मिळालेले अब्जावधी डॉलर्स त्यांनी सामाजिक कार्यक्रमांमध्ये गुंतवले.

पण त्यांचे उत्तराधिकारी निकोलस मादुरो यांना तेलाच्या घसरत्या किमतीमुळं आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तसंच त्यांच्या कार्यकाळात त्यांना राजकीय संकटाचाही सामना करावा लागला.

त्यामुळं व्हेनेझुएलाची यंत्रणा जणू मोडकळीस आली होती. त्यामुळं व्हेनेझुएलामध्ये रोज सरकारविरुद्धं निदर्शनं होत होती.

लाखो नागरिकांनी देश सोडून कोलंबिया आणि ब्राझीलमध्ये आश्रय घेतला. व्हेनेझुएलाच्या प्रचंड गरीबी असलेल्या काही भागात 70 टक्के मुलं कुपोषित असल्याचं समोर आलं.

शेजारी देश गयानाबरोबरच्या दीर्घकालीन सीमावादातही व्हेनेझुएला अडकला आहे. याठिकाणी असलेल्या तेलसाठ्यांच्या भागावरूनही वाद आहेत.

अमेरिकेबरोबर असं वाढलं शत्रूत्व

अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील सध्याच्या राजवटीत पाहायला मिळणाऱ्या शत्रूत्वाची सुरुवात ह्यूगो चावेझ यांच्या काळात झाली होती. ट्रम्प यांच्या काळात त्यात आणखी वाढ झाली.

सरकारच्या नियंत्रणात असलेल्या निवडणूक आयोगानं जुलै 2024 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजयी घोषित केलं आणि सलग तिसऱ्यांदा पदावर विराजमान झाले.

विरोधी पक्षानं त्यांचे उमेदवार एडमंडो गोंझालेझ हेच खरे विजेते असल्याचा दावा केला होता.

Getty Images डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यानही अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या नात्यात कटुता आली होती. (संग्रहित)

अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर अनेक सरकारांनी मतदानाचा तपशीलवार डेटा जाहीर केल्याशिवाय मादुरो यांना व्हेनेझुएलाच्या निवडणुकीत विजेता म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. तर चीन, रशिया आणि इराण सारख्या देशांनी त्यांना मान्यता दिली आहे.

यापूर्वी, 2018 मध्ये झालेल्या मागील निवडणुकांतही अमेरिकेसह अनेक सरकारांनी पक्षपातीपणाचा आरोप करत व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते.

इतिहास

1498-99 मध्ये स्पेनमध्ये क्रिस्टोफर कोलंबस आणि अलोन्सो डी ओजेदा यांनी व्हेनेझुएलाला भेट दिली. तिथे कॅरिब, अरावाक आणि चिबचा लोक राहत होते.

स्पेनने 1521 मध्ये व्हेनेझुएलामध्ये वसाहत वसवायला सुरुवात केली होती. नेपोलियनने 1810 मध्ये स्पेनवर आक्रमण केलं, तेव्हा व्हेनेझुएलाच्या लोकांनी संधी साधली आणि स्वातंत्र्य घोषित केलं.

1908-35 पर्यंत हुकूमशहा जुआन व्हिसेंटे गोमेझ यांच्या राजवटीत , व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार बनला.

1945 मध्ये अनेक दशकांच्या लष्करी राजवटीनंतर पहिल्यांदाच देशात सामान्य लोकांनी स्वतःचं सरकार स्थापन केलं.

1973 - व्हेनेझुएलाला तेलाच्या वाढत्या किमतींचा फायदा झाला आणि त्यांचं चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याच्या सर्वोच्च मूल्यावर पोहोचलं. देशातील तेल आणि पोलाद उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

1989 मध्ये, आर्थिक मंदीच्या काळात कार्लोस आंद्रेस पेरेझ अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी आयएमएफ कर्जाचा वापर करून खर्चाच्या अनेक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर दंगली, मार्शल लॉ आणि सार्वत्रिक संप झाला त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

Getty Images व्हेनेझुएलाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांनी 2005 मध्ये भारताचा दौरा केला होता. (संग्रहित)

1992 मध्ये कर्नल ह्यूगो चावेझ आणि त्यांच्या समर्थकांनी दोनदा सत्तापालटचा प्रयत्न केला. या सत्तापालटात सुमारे 120 लोक मारले गेले आणि दोन वर्षांनी कर्नल चावेझ यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यांना माफी देण्यात आली.

1998 मध्ये, जुन्या पक्षांबद्दलच्या निराशेच्या पार्श्वभूमीवर, ह्यूगो चावेझ अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी 'बोलिव्हरियन क्रांती' सुरू केली.

त्यांनी तेलाच्या नफ्याचा वापर करून समाजवादी आणि लोकप्रिय आर्थिक आणि सामाजिक धोरणे राबवली आणि अमेरिकाविरोधी परराष्ट्र धोरणाचे नेतृत्व केले.

2005 मध्ये ह्यूगो चावेझ चार दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. दोन्ही देशांमधील चर्चेत ऊर्जा क्षेत्र हा एक महत्त्वाचा अजेंडा होता.

2006 मध्ये, व्हेनेझुएलाने रशियासोबत 3 अब्ज डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार केला, त्यामुळं अमेरिकेवरील त्यांचं अवलंबित्व संपलं.

2012 मध्ये चावेझ चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुढच्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

2013 मध्ये, चावेझ यांचे निवडलेले उत्तराधिकारी निकोलस मादुरो हे या ढासळत्या अर्थव्यवस्थेत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष बनले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

  • व्हेनेझुएलानंतर ट्रम्प प्रशासनाच्या निशाण्यावर ग्रीनलँड? 'त्या' फोटोवरुन काय वाद सुरु झालाय?
  • सिलिया फ्लोरेस : मादुरो यांच्या पत्नी, ज्यांना व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट वॉरियर' म्हणून ओळखतात
  • 'व्हेनेझुएला'नंतर अमेरिकेची जागतिक भूमिका ठरणार का? ट्रम्प यांच्या राजकारणावर काय परिणाम?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.