अजितदादांचं शरद पवारांविषयी भर सभेत मोठं विधान, म्हणाले काकांच्या पुण्याईने माझं…
Tv9 Marathi January 07, 2026 10:45 AM

Ajit Pawar : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची धूम आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे प्रचारासाठी राज्यातील बड्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये बोलताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी मतदारांनी आम्हाला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या भाषणात त्यांनी खासदार शरद पवार यांचा उल्लेख करत केलेल्या विधानाची सगळीकडेच चर्चा होत आहे.

शेवटी माणसाने माणुसकी जपायची की…

माझी जन्मभूमी जरी बारामती असली तरी पिंपरी चिंचवड माझी कर्मभूमी आहे. ही गोष्ट आयुष्यात मी विसरू शकत नाही. अनेकांना मी पद दिली. पद देणं आपल्या हातात असतं. शेवटी माणसाने माणुसकी जपायची का सोडायची हे ज्याच्या त्याच्या हातात असते,” अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या. तसेच अनेक जण सोडून गेले. असे किती येतात-जातात मला फरक पडत नाही. माझ्या माय-माऊली माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी कुणाच्या बाला घाबरत नाही, असेही अजित पवार ठणकावून म्हणाले.

दादागिरी कोणाची चालली? भ्रष्टाचार कोण करतंय?

मी पिंपरी चिंचवडचा विकास केला पण कधी कर्ज काढलं नाही. आता पालिका कर्जबाजारी झालीये. आता मला सांगा ह्यांनी 40 हजार कोटींची कामं केली ती कुठं केली? कुठं गेला हा पैसा? ह्याचा जाब आपण विचारायला नको? असा सवाल करत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मी महेश लांडगे यांना स्थायी समितीचे अध्यक्ष केले.. यातून त्याने जे करायचं ते केलं. मग विधानसभेला आपल्याच विलास लांडे विरोधात बंडखोरी केली. त्यानंतर शहरात काय-काय होतंय, हे तुम्ही पाहताय. आज दादागिरी कोणाची चालली? रिंग कोणाची सुरुये? भ्रष्टाचार कोण करतंय? वरिष्ठ इतर कामांत व्यग्र आहेत. त्यामुळं त्यांचं याकडे लक्ष नसेल ही. पण मी पालकमंत्री आहे. आपण लक्ष ठेऊन आहोत. कोयता गॅंग दहशत करत आहे. गाड्या फोडत आहे. ज्याची गाडी फोडली त्यांच्या आईवडिलांनी किती कष्ट करून ती गाडी घेतलेली असेल, असे म्हणत आम्ही सत्तेत आलो तर गुन्हेगारांचा बंदोबस्त करू, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.

काकांच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय

तसेच पुढे बोलताना त्यांनी, काकांच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय, असं थेट विधान केलं. काकांच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय. गळ्या शपथ सांगतो, असेही अजितदादा म्हणाले. मतदानाच्या आदल्या दिवशी प्रलोभन दाखवलं जाईल. कोणाला जास्त झालं असेल तर त्यांच्याकडून घ्या, काय घ्या, हे मी सांगितलं नाही. परंतु संधी मात्र आम्हालाच द्या, असेही अजित पवार म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.