बंडखोर उमेदवारासह अधिकृत उमेदवारही भाजपमध्ये, उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका; पुण्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग
Tv9 Marathi January 07, 2026 10:45 AM

राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. अशातच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का

पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9 (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक 11 (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचे पाटील यांनी पक्षात स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अतिशय आनंद देणारे असून, यापूर्वी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही नांदी आहे.’

या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक 11 मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.