दोन मुलं झाल्यानंतरही तो तुला सोडून जाईल..; पंकज कपूर यांच्याविषयी सुप्रिया पाठक यांच्या आईने दिलेला इशारा
Tv9 Marathi January 07, 2026 04:45 PM

प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांनी 1988 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पंकज आणि सुप्रिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील सर्वांत मजबूत आणि दीर्घकाळ टिकलेल्या जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत. परंतु इथवरचा त्यांचा प्रवास सहजसोपा नव्हता. एका मुलाखतीत सुप्रिया यांनी सांगितलं होतं की लग्नानंतर जवळपास दहा वर्षांपर्यंत त्यांच्या आईला भीती वाटत होती की, पंकज कपूर त्यांच्या मुलीला सोडून जातील. सुप्रिया आणि पंकज यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोन मुलांच्या जन्मानंतरही ते तुला सोडून जातील, अशी भीती सुप्रिया पाठक यांच्या आईने त्यांच्याकडे व्यक्त केली होती.

सुप्रिया यांनी 1993 मध्ये मुलगी सनाला आणि 1997 मध्ये मुलगा रुहानला जन्म दिला. ‘बीबीसी न्यूज हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आईला वाटणाऱ्या भीतीविषयी सांगितलं होतं. “दोन मुलांच्या जन्मानंतरही तो तुला सोडून जाईल, असं आई सतत म्हणायची. परंतु त्याबद्दल मी फार चिंता केली नाही. परिस्थितीचा मी स्वीकार केला आणि पुढे चालत राहिले. पंकज कपूर यांचं हे पहिलं लग्न नव्हतं. त्याआधी त्यांनी नीलिमा अझीम यांच्याशी लग्न केलं होतं. कदाचित यामुळे आईला सतत माझ्या लग्नाविषयी चिंता वाटायची.”

पंकज आणि सुप्रिया यांची पहिली भेट दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या एका चित्रपटादरम्यान झाली होती. जेव्हा सुप्रिया यांना समजलं की त्यात पंकज भूमिका साकारणार आहेत, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. पंकज यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नंतर त्यांना समजलं की चित्रपटातील या दोन्ही भूमिकांचं एकमेकांशी काही संबंधच नव्हता. त्यामुळे त्यांचे पंकज यांच्यासोबत सीनच नव्हते. त्यानंतर पंजाबमधल्या गिद्दरबाहामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. तरीही हा चित्रपट कदाचित आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ यावं यासाठी बनला होता, असं सुप्रिया मानतात.

पंकज कपूर यांच्याशी लग्नाबद्दलची गोष्ट जेव्हा सुप्रिया यांनी त्यांच्या घरी सांगितली तेव्हा त्यांची आई आणि दिग्गज अभिनेत्री दीना पाठक या लग्नाविरोधात होत्या. दीना पाठक यांना नेहमी असा संशय असायचा की पंकज कपूर हे एके दिवशी सुप्रिया यांना सोडून जातील. दीना पाठक त्यांच्या मुलीला म्हणायच्या की, “तू चूक केलीस. पंकज तुला सोडून जाईल.” त्याकडे सुप्रिया पाठक नेहमी दुर्लक्ष करायच्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.