प्रदूषण, अस्वच्छता आणि प्रशासनाचे मौन!
नरकयातनांतून सुटका कधी होणार? माहुलवासीयांचा आक्रोश
जीवन तांबे, भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आम्ही माणसे आहोत, पण आम्हाला आजही जनावरांसारखे जगावे लागते, असा संतप्त आक्रोश आहे माहुल एमएमआरडीए वसाहतीतील रहिवाशांचा. घातक रासायनिक उद्योग, जीवघेणे प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे येथील नागरिक अक्षरशः नरकयातना भोगत असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संताप उफाळून आला आहे. आमच्या प्रश्नांची जाण असणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.
वाशी नाका, माहुल गाव परिसरात असलेल्या टाटा पॉवर, बीपीसीएल, एचपीसीएल यांसारख्या रिफायनरी व औद्योगिक प्रकल्पांमुळे हवेत सतत विषारी वायू मिसळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गॅससारखा तीव्र वास, धुराचे लोट आणि धुळीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. या प्रदूषणाचा फटका गव्हाणपाडा, गडकरी खाण आणि आंबा गाव परिसरालाही बसत आहे.
माहुल एमएमआरडीए वसाहतीत एकूण ७२ इमारती असून, त्यापैकी २५ इमारतींमध्ये पाच हजारांहून अधिक कुटुंबे राहतात. मात्र संपूर्ण परिसरात सांडपाणी रस्त्यांवर वाहणे, कचऱ्याचे ढीग, माती व धुळीचे ढीग, दुर्गंधीयुक्त पाणी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी जाणे आणि डासांची उत्पत्ती यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
या प्रदूषणाचा थेट परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. अंगाला खाज येणे, केस गळणे, डोळ्यांची जळजळ, मलेरिया, डेंग्यू, जुलाब, क्षयरोग, त्वचारोग, कर्करोग, लकवा अशा गंभीर आजारांनी परिसर ग्रासला आहे. पुरेसा सूर्यप्रकाशही मिळत नसल्याने आजारांचे प्रमाण वाढत आहे. जगावे की मरावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुनर्वसन नव्हे, नरकवास!
पुनर्वसनाच्या नावाखाली आम्हाला नरकात ढकलण्यात आले आहे, असा आरोप रहिवाशांचा आहे. आधी झोपडीत राहत होतो, तरी स्वच्छतेत जगत होतो. आज पक्क्या घरात असूनही आरोग्य धोक्यात आले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
तक्रारींकडे सर्रास दुर्लक्ष
महापालिका, एमएमआरडीए प्रशासन, खासदार, आमदार आणि नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. निवडणुकीपुरते आश्वासन आणि त्यानंतर पाच वर्षांचे मौन, असा अनुभव असल्याचे नागरिक सांगतात.
पालिका आणि एमएमआरडीए मूलभूत सुविधा देत नाहीत. प्रदूषणामुळे माझ्या वडिलांना कर्करोग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
- प्रवीण रणशूर, स्थानिक रहिवासी
आठ वर्षांपासून साचलेल्या पाण्यातून वाट काढतोय. मच्छर, डेंग्यू, टायफॉइडमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आहे.
- अल्फिया तनवीर खान, स्थानिक रहिवासी
इमारतीतील फुटलेल्या पाइपमुळे शौचालयाचे पाणी खाली साचते आणि पिण्याच्या टाकीत मिसळते.
- तायरा शेख, स्थानिक रहिवासी
चार वर्षांपासून सफाईसाठी पाठपुरावा करतोय, पण प्रशासन गंभीर नाही.
- अनिल ओव्हाळ, स्थानिक रहिवासी
प्रदूषण आणि घाणीमधून सुटका करण्यासाठी पालिका व एमएमआरडीएकडे मागणी केली होती; मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले. न्यायालयाने पुनर्वसन किंवा दरमहा १५ हजार रुपये भाडे देण्याचे आदेश दिले. त्या आदेशाचे पालन प्रशासन करीत नाही.
- बिलाल खान,
अध्यक्ष - कामगार संवर्धन सन्मान संघ