Rahuri News: हिंदुत्ववादी संघटना आक्रमक! श्री बुवासिद्ध देव महाआरती, पादुका काढण्याच्या निर्णयाचा भाविकांकडून निषेध !
esakal January 12, 2026 08:46 PM

राहुरी : शहरातील श्री बुवासिद्ध देव मंदिरात सकल हिंदू समाजातर्फे महाआरती प्रसंगी ठेवलेल्या नाथांच्या पादुका काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. तरुणांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. प्रशासनाने नमती भूमिका घेतल्यावर तणाव निवळला. त्यानंतर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!

राहुरी शहरात आज (रविवारी) सकल हिंदू समाजातर्फे श्री बुवासिद्ध देव मंदिर ते श्रीक्षेत्र मढी व गोरक्षनाथ गड मायंबा (ता. पाथर्डी) दरम्यान जनजागृती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्त श्री बुवासिद्ध देव मंदिरात महाआरती करून राहुरी शहरातून रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री बुवासिद्ध देव मंदिरात नाथांच्या पादुका ठेवून साधुमहंत आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

आरती झाल्यावर प्रशासनाने नाथांच्या पादुका काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. तरुणांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. प्रशासन व हिंदुत्ववादी तरुण आमने सामने उभे ठाकले. त्यामुळे मंदिर परिसरात मोठा तणाव पसरला. यावेळी महसूल व पोलिस प्रशासनाने नमती भूमिका घेतली. त्यामुळे तणाव निवळला. श्री बुवासिद्ध बाबांच्या प्रतिमेची पुष्पहारांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणुकीची खंडोबा मंदिर येथे सांगता झाली.

नंतर श्री क्षेत्र मढी व गोरक्षनाथ गड, मायंबा (ता. पाथर्डी) येथे नाथ जागृती पदयात्रा मार्गस्थ झाली. मिरवणुकीत साधू महंतांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, युवा नेते अक्षय कर्डिले, रावसाहेब चाचा तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे नगरसेवक गजानन सातभाई, सोन्याबापू जगधने, प्रतिक तनपुरे, प्रदीप भुजाडी, प्रशांत डौले, राजेंद्र उंडे, माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

राहुरी शहरातील श्री बुवासिद्ध देवस्थानचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या विषयावर कोणतेही भाष्य करणार नाही. याठिकाणी धार्मिक वादविवाद होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

- संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.