Ahilyanagar Crime: कंदुरीतील गोळीबारात एक ठार; नेवासे तालुक्यातील धक्कादायक घटना, शेख वस्तीवर युवकांच्यात वाद अन्..
esakal January 12, 2026 11:46 PM

सोनई : चांदे (ता. नेवासे) येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील ६ नंबर चारी परिसरात आज (ता. ११) सायंकाळी ६ वाजता शेख वस्तीवर कंदुरीचा कार्यक्रम सुरू होता. त्यात दोन युवकांतील वाद शिगेला पोचला अन् पिस्तुलातून गोळीबाराच्या फैरी सुरू झाल्या. कार्यक्रमास उपस्थित नातेवाईक व परिसरात एकच धांदल उडून एकच धावपळ उडाली. या घटनेत शाहीद राजमहंमद शेख (वय २५) या युवकाचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!

घटनेची माहिती मिळताच रात्री साडेआठ वाजता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व शेवगाव पोलिस विभागाचे पोलिस उपाधीक्षक निरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन सोनई पोलिसांना तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. बऱ्हाणपूर रस्त्यावरील ६ नंबर चारी परिसरात असलेल्या शेख वस्तीवर आज कंदुरीचा कार्यक्रम होता. येथे दुपारपासून नातेवाईक, भाऊबंद व मित्र मंडळ जमा झाले होते.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन युवकांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ६ वाजता पिस्तुलातून गोळीबाराचा आवाज होताच एकच धावपळ उडाली. घटनास्थळी नातेवाईक येईपर्यंत आरोपी पसार झाले होते. घटनेची खबर देताच सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी, फौजदार सूरज मेढे व पोलिसांचा फौजफाटा काही वेळातच दाखल झाला. स्थानिक नागरिक व युवकांकडून समजलेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरविण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जिकडे तिकडे चोहीकडे गावठी पिस्तूले

नेवासे तालुक्यात दहा वर्षापासून गावठी पिस्तूलासाठी चांदे, घोडेगाव, शनिशिंगणापूर, नेवासे, सोनई व मुळाथडीतील काही गावे प्रसिद्ध आहेत. तालुक्यात पिस्तूल विक्रीचे सुद्धा रॅकेट कार्यरत असल्याच्या तक्रारी असताना छापासत्र व कारवाई दिसत नाही. कुणाचाच धाक नसल्याने वाळू व मुरूम रॅकेट तसेच प्लाॅटींग, खासगी सावकारी, रस्तालूट आदी क्षेत्रात असलेल्या व्यक्तींच्या कमरेला पिस्तूल असल्याचे बोलले जाते. अनेकांकडे धाक निर्माण करणे व दाखविण्यासाठी पिस्तूल आहेत. मागील दोन वर्षात वाद व मारामाऱ्या घटनेत हवेत गोळीबार अथवा धाकात घेण्यासाठी वापर झाला आहे. घटना घडल्यानंतर धावपळ उडत असली तरी यावर नियंत्रण करिता प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात व तालुक्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी राबविलेल्या विशेष मोहीमप्रमाणे शोध मोहीम व्हावी असा सूर उमटत आहे.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

चांदे गोळीबार घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकास अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन चाललो आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी काय सांगतात, त्यानंतर माहिती दिली जाईल.

- सूरज मेढे, फौजदार, सोनई

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.