RCB vs UPW WPL 2026 : १५ चेंडूंत ७० धावा! ग्रेस हॅरिसची वादळी फटकेबाची, स्मृती मानधनाची साथ; RCBचा सर्वात मोठा विजय
esakal January 13, 2026 12:45 PM

Smriti Mandhana and Grace Harris partnership : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून महिला प्रीमिअर लीग२०२६ मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ग्रेस हॅरिसने ४० चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी केली आणि तिला स्मृतीच्या ४७ धावांची साथ मिळाली. RCB ने सोमवारी यूपी वॉरियर्सवर ९ विकेट्स व ४७ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि Point Table मध्ये अव्वल स्थान पुन्हा पटकावले.

ग्रेस हॅरिसने दमदार कामगिरीमुळे RCBने १४४ धावांचे लक्ष्य ४७ चेंडू शिल्लक असताना पार केले, जे आतापर्यंतच्या स्पर्धेत संघाचा सर्वात मोठा विजय आहे. स्मृती मानधनाने नाबाद ४७ धावा करून पाठलाग करणाऱ्या संघाचा शेवट सुरळीत पार केला. RCBच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली, मानधनाने स्थिरावणारी भूमिका बजावली तर हॅरिसने उत्तुंग फटकेबाजी केली. पण, हॅरिसचे शतक हुकले. तिने १० चौकार व ५ षटकारांचा पाऊस पाडताना १५ चेंडूंत ७० धावा कुटल्या. रिचा घोष ४ धावांवर नाबाद राहिली.

बंगळुरूने १२.१ षटकांत १ बाद १४५ धावा करून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने ५ बाद १४३ धावा केल्या. मेग लॅनिंग ( १४) व हर्लिन देओल ( ११) अपयशी ठरल्यानंतर दीप्ती शर्मा व डिएंड्रा डॉटिन यांनी तळाच्या क्रमांकावर येताना संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिल्या. दीप्ती ३५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांची नाबाद खेळी केली. डॉटीननेही ३७ चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या.

Women's Premier League Points table

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलग दोन विजयांसह १.९६४ असा नेट रन रेट घेऊन तालिकेत अव्वल स्थानी आहे. गुजरात जायंट्सनेही दोन्ही लढती जिंकल्या आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा ०.३५० असा असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सने दोनपैकी एक सामना जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्स व यूपी वॉरियर्स यांना दोन सामन्यानंतरही विजयाचे खाते उघडता आलेले नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.