मुंबई - ‘ठाकरेंनी मराठी मुलांना फक्त वडापावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग आणि रोजगारही देऊ. उद्योजकांची गुंतवणूक नाकारली तर आपल्याच मुलांना रोजगार मिळणार नाहीत. तरुणांच्या नोकऱ्यांसाठी आम्ही उद्योजकांचे स्वागत करू, मात्र कोणालाही झुकते माप देणार नाही,’’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजी पार्कवरील युतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत आक्रमकपणे ठाकरे बंधूंवर प्रहार केला.
‘काल आदित्य ठाकरे यांनी आपली नक्कल केली, मात्र इतकी वर्षे लोकांच्या नकला करणाऱ्या तुमच्या काकांच्या पक्षाची आज काय अवस्था आहे, ते बघा आणि आता तुमची आणि तुमच्या पक्षाची पुढे काय अवस्था होईल? याचाही विचार करा,’ असा टोला त्यांनी आदित्य यांना लगावला.
विकासावर मला चर्चेचे आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंसाठी माहीमच्या उमेदवार, मुंबई भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई पुरेशा आहेत. ठाकरे यांनी उद्या त्यांच्याशी चर्चा करावी, अशा शब्दांत त्यांनी आदित्य यांची खिल्ली उडविली.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रामदास कदम, भाजपचे नेते आशिष शेलार, शिवसेनेचे नेते रामदास कदम आदी मान्यवर उपस्थि होते. फडणवीस यांनी या वेळी अत्यंत आक्रमकपणे, मराठी माणूस आणि महाराष्ट्र व मुंबईच्या हिताचा मुद्दा पुढे करून कालच्या ‘मविआ’च्या सभेतील मुद्द्यांना जोरकस प्रतिउत्तर दिले.
‘विकासावर बोलायचे तर मर्द असावे लागते. कुणाच्या मर्दानगीबाबत मी बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. पण तुम्ही माझ्या आई-बाबांवर देखील घसरला होतात. आज माझे वडील स्वर्गातून बघतील तर त्यांना आपल्या मुलाने हिंदुत्वाचा वारसा चालविल्याचे पाहून अभिमान वाटेल.
पण तुमचे वडील स्वर्गातून खाली बघतील तेव्हा त्यांना आपला मुलगा रशीद मामू यांच्या शेजारी बसलेला दिसेल,’ असा तुफानी प्रतिहल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.
‘चुल्लूभर पानी मे डूब मरो’
‘पंचवीस वर्षे तुमची पालिकेत सत्ता होती तरी मराठी माणूस आज अडचणीत असल्याचे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही ‘चुल्लूभर पानी मे डूब मरो’ अशी टीका फडणवीस यांनी केली. सारी कामे अदानी यांना दिली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला.
काँग्रेस, कम्युनिस्ट, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस अशा भाजपेतर पक्षांच्या राज्यांमध्ये अदानी यांनी केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आकडे त्यांनी दिले. अदानींची संपत्ती मोदींमुळे वाढली हा आरोप खोडून काढताना फडणवीस यांनी टाटा, एचडीएफसी, सन फार्मा, गोदरेज, डी मार्ट, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय बँक या सर्वांचा महसूल गेल्या बारा वर्षांत तीनशे ते पंधराशे टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले.
तेव्हा महाराष्ट्र हित नव्हते का?
‘महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र आलो, असे आता ठाकरे बंधू सांगतात. मग वीस वर्षांपूर्वी वेगळे होताना महाराष्ट्र हित नव्हते का?’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.
‘मुंबईतील मराठी माणसांचे अस्तित्व कधीही धोक्यात नव्हते, आताही धोक्यात नाही आणि केव्हाही धोक्यात राहणार नाही. मराठी माणसांचे हित जपायला आम्ही समर्थ आहोत. मुंबईतील मराठी माणसांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. फक्त तुमचे राजकारण धोक्यात आले आहे,’ अशी टीका शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली.
‘जमिनीवरील अधिकार हे भूमिपुत्रांचेच’
वाशी - ‘नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे हक्क अबाधित ठेवत साडेबारा टक्के भूखंडधारकांना निश्चितपणे मालकी हक्क देण्यात येणार असून, झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळवून देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘नवी मुंबईतील सर्व जमिनीवरील अधिकार हे भूमिपुत्रांचेच असतील,’ असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
ऐरोली येथे भाजपच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन, शहराचा भविष्यातील विकास आराखडा यांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. ‘महापालिकेत सत्ता आल्यानंतर नवी मुंबईचे कोणतेही विकासकाम अडणार नाही. शहराच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले,
ही सभा प्रचाराची नाही तर परिवर्तनाची
टीका टोमण्यांना उत्तरे देणार नाही
काहींना निवडणूक आली की मराठी माणूस दिसतो
मराठी माणसाचे अस्तित्व कधीच धोक्यात नव्हते
मुंबईचे हित जपण्यासाठी समर्थ आहोत
ठाकरे बंधू वीस वर्षांपूर्वी एकत्र का आले नाहीत?
ठाकरेंची आताची युती ही राजकीय स्वार्थासाठी