Chandrashekhar Bawankule: विकासाचा अजेंडा टाळून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची राज व उद्धव ठाकरेंवर टीका!
esakal January 13, 2026 07:45 PM

नागपूर: विकासाचा अजेंडा बाजूला ठेवत राज ठाकरे व उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Karad News: ऊस आंदोलन खटल्यानिमित्त दिसले ऋणानुबंध; शेतकरी संघटनेचे तीन नेते अनेक वर्षांनंतर एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा!

भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने मते मागितली गेली; मात्र आता विकासावरच मते मागावे लागणार आहे.

त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही; पण त्यांच्या पक्षांची अधोगती होत आहे, याचे कारण प्रचाराची चुकीची दिशा आणि घेतलेले निर्णय आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ‘मुंबई तोडणार’ अशा विधानांना आता कोणीही गांभीर्याने घेणार नाही. सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिणारे विकासाबद्दल बोलू शकत नाहीत. आदित्य ठाकरे यांची मिमिक्री व वक्तव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्र आणि मुंबई कुठे चालली आहे, याची दिशा त्यांना कळत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तुलना करण्याइतकी क्षमता आहे का, हे जनतेला मान्य आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने वेळ का मागितली, याची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही. मात्र फेब्रुवारीत दहावी-बारावीच्या परीक्षा, नुकत्याच होणाऱ्या निवडणुका, बजेट सत्र आणि निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन यामुळे आयोगाला काहीसा वेळ लागत असावा, असे बावनकुळे यांनी सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजनेला काँग्रेसचा नेहमीच विरोधात राहिला आहे. काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात ही योजना बंद झाली. न्यायालयात गेले असता त्यांना धक्का बसला. आता मकरसंक्रांतीला लाभार्थींना पैसे मिळत असतानाही त्यांचा विरोध आहे, असे ते म्हणाले.

स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय

विदर्भात सर्वत्र भाजपला यश मिळेल, तर काँग्रेसची ताकद कमी होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. अमरावतीत युवा स्वाभिमानी संघटनेच्या भूमिकेबाबत स्थानिक नेत्यांनी परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला आहे. युतीनंतर अधिक उमेदवार उभे राहिल्याने काही भूमिका घ्याव्या लागल्या; स्थानिक नेतृत्व वेगळा विचार करत आहे, असे बावनकुळे म्हणाले.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय? आचारसंहितेचा भंग नाही

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि विकास हेच मुद्दे चालणार आहेत. पुढील दोन दिवसांच्या प्रचारात नागपुरात एक रॅली होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाच्या आक्षेपांबाबत ते म्हणाले की, ही योजना नियमितपणे सुरू असल्याने आचारसंहितेचा भंग होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग ही योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.