Shivendraraje Bhosale : पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहा; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन
esakal January 13, 2026 07:45 PM

पिंपरी - ‘उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील आयटी कंपन्या शहर व राज्याबाहेर जाऊ द्यायच्या नसतील, तर भारतीय जनता पक्षाला मतदान करा. राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे रहा,’ असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. ‘कोण काय सांगतोय?, काय बोलतोय?, काय घोषणा देतोय? याकडे लक्ष न देता भाजपला मतदान करा,’ असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चिखलीत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेतृत्व आपल्यासाठी आहे. त्यामुळे शहराची प्रगती होत आहे. असे नेतृत्व महाराष्ट्रात दुसरे नाही.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील समस्या त्यांना माहिती आहेत. प्रत्येक माणसाला मुख्यमंत्री आपले वाटतात. मुंबईत पायाभूत सुविधा त्यांच्यामुळेच आल्या आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे.

येथील उद्योगधंदे, आयटी कंपन्या बाहेर जाऊ न देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला काम करायचे आहे. प्रशासनावर पकड असलेला नेता आपल्याला हवा आहे. राज्य व केंद्रामध्ये आपले सरकार आहे. सरकार दमदारपणे काम करीत आहेत. हे सर्व असताना अन्य कोणी महापालिकेत आले तर विकास कसा होणार? विकास करायचा असेल तर महापालिकेत भाजपच असायला हवे,’ असे मंत्री भाेसले म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.