इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरुद्ध आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलत बळाचा वापर केला. यात जवळपास 1850 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यावरून अमेरिकेने इराणला गंभीर इशारा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य उतरवण्याची भाषा केली होती. अशातच आता ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आता ट्रम्प यांनी इराणी सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन करत तुम्हाला मदत पोहोचवत आहोत अशी माहिती दिली आहे. मात्र आता ही मदक कोणत्या स्वरूपात असेल याबाबत माहिती समोर आलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणमध्ये 28 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 1847 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेतील मानवाधिकार संघटना ह्यूमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी (HRANA) ने दिली आहे. तर काही अहवालांमध्ये ही संख्या 2000 पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी आंदोलकांना आवाहन करताना ट्रुथ सोशलवर लिहिले, “इराणी देशभक्तांनो, आंदोलन सुरू ठेवा आणि तुमच्या संस्था ताब्यात घ्या. खुनी आणि अत्याचारींची नावे लक्षात ठेवा; त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. आंदोलकांची बेकायदेशीर हत्या थांबेपर्यंत मी इराणी अधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक घेणार नाही. मदत येत आहे.” ट्रम्प यांनी त्यांच्या संदेशाच्या शेवटी MIGA, असे लिहिले आहे. याचा अर्थ “इराणला पुन्हा महान बनवा” असा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या एक दिवस आधी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, ‘आम्ही अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशांमधील संवादाचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही.’ मात्र आता, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इराणमधील आंदोलकांवरील कारवाई थांबेपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊस उचलले असल्याचे बोलले जात आहे. याआधी ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध “कठोर” पर्यायांचा विचार करत आहे.