डोंबिवली विभागीय कार्यालयात बेकायदा बॅनर-होर्डिंगचा ढीग
महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या परिसरात होर्डिंग्ज, फेरीवाल्यांकडून जप्त केलेल्या हातगाड्या, टाकाऊ लोखंडी साहित्य व इतर भंगार अनेक दिवसांपासून खितपत पडून आहे. त्यातच कार्यालयाबाहेरील बेकायदा दुचाकी पार्किंगमुळे संपूर्ण परिसर बकाल झाला आहे. शहरातील बेकायदा बॅनर हटविण्याची मोहीम सुरू असताना, महापालिकेच्या कार्यालयाच्या आवारातील ही अवस्था नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
सध्या पालिकेअंतर्गत १२२ प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, गुरुवारी (ता. १५) मतदान, तर शुक्रवारी (ता. १६) मतमोजणी होणार आहे. तब्बल १० वर्षांनंतर नगरसेवकांची निवड होणार असल्याने निवडणुकीची धामधूम वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून शहरात ठिकठिकाणी अनधिकृत बॅनर व होर्डिंग लावण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली विविध प्रभागांत पालिकेच्या वतीने कारवाई सुरू आहे. कारवाई सुरू असली, तरी काढून टाकलेले बॅनर व होर्डिंग यांची योग्य विल्हेवाट न लावता ती थेट डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात टाकली जात आहेत.
या विभागीय कार्यालयात ‘फ’ व ‘ग’ असे दोन प्रभाग कार्यालये आहेत. मात्र, परिसरात साचलेले भंगार, होर्डिंग आणि कचऱ्यामुळे येथे जणू भंगाराचे गोदामच उभे राहिल्याचे चित्र आहे. कार्यालयाच्या शेजारीच महापालिकेची शाळा असून, पटसंख्येअभावी कौलारू शाळेचा एक भाग अनेक वर्षांपासून बंद आहे. तरीही मोकळ्या जागेचा उपयोग कार्यालयीन विस्तारासाठी न करता तेथे भंगार व होर्डिंग साठवले जात आहे.
साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात कचरा साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विद्रूपीकरण दूर करण्याची मोहीम सुरू असताना, महापालिकेच्याच कार्यालय परिसरातील विद्रूपीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने ‘इथल्या विद्रूपीकरणाचे काय,’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तीव्र दुर्गंधी
विशेष बाब म्हणजे, या ठिकाणी जप्त केलेले बॅनर व होर्डिंग टाकण्यात येतात, त्या ठिकाणी काही महापालिका कर्मचारी जप्त टपऱ्यांमध्ये लघुशंका करत असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, शेजारील मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारीही करण्यात आल्या आहेत, तर साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात कचरा साचून डासांचे प्रमाण वाढले आहे.
महापालिकेने प्रथम आपल्या कार्यालयांकडे लक्ष द्यावे
सध्या हे विभागीय कार्यालय वापराविना बंद असले, तरी भोवताली पडलेल्या भंगार, बॅनर व होर्डिंगच्या गराड्यामुळे संपूर्ण इमारत भंगाराच्या गोदामात रूपांतर झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने प्रथम आपल्या कार्यालयांच्या परिसराकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.