चिंचवड, ता.१२ ः इंदिरानगर परिसरात महापालिकेकडून चेंबरच्या कामासाठी चार दिवसांपूर्वी तीन ते चार ठिकाणी डांबरी रस्ता खोदण्यात आला. चेंबरचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यावरील उखडलेले डांबर तसेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
हा रस्ता बिजलीनगरकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने दिवसभर या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. सायंकाळच्या वेळेस खोदलेला व ओबडधोबड ठेवलेला रस्ता वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकीस्वार व चारचाकी चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची साधने, सूचना फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन हा रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे.