IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला; पण, किवी गोलंदाजाने भन्नाट चेंडूवर दांडा उडवला
esakal January 15, 2026 07:45 AM

India vs New Zealand 2nd ODI Marathi Live Update : भारतीय संघाची दुसऱ्या वन डे सामन्यात सुरूवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावून फॉर्म मिळवला. मात्र, ज्याच्यावर विश्वास होता, तो विराट कोहली ( Virat Kohli) आज निराश झाला. न्यूझीलंडचा गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला.

भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना राजकोट येथे खेळवला जातोय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत भारतीय फलंदाजांवर चांगले दडपण बनवले होते. पण, रोहित शर्माव शुभमन गिल यांनी संयमी खेळ करून जम बसवला. रोहित ( २४ धावा) याही सामन्यात मोठी खेळी करण्यापासून वंचित राहिला. कर्णधार शुभमनने ५३ चेंडूंत ५६ धावांची खेळी करून फॉर्म मिळवला . कायले जेमिन्सनने त्याची विकेट घेतली.

ODI Rankings: किंग इज बॅक! विराट रोहितला मागे टाकत पुन्हा सिंहासनावर विराजमान, कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रमही केला

रोहितला बाद करणाऱ्या क्रिस्टियन क्लार्कने भारताचा उप कर्णधार श्रेयस अय्यर ( ८) यालाही माघारी पाठवले. विराट दुसऱ्या बाजूने चांगला खेळत होता आणि त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडला. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावांच्या विक्रमात विराटने ( १७५१) सचिन तेंडुलकरला ( १७५०) मागे टाकले. विराटने ३५ डावांत या धावा केल्या, तर सचिनला ४१ डाव खेळावे लागले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ५० डावांत १९७१ धावा करून अव्वल स्थानी आहे. कुमार संगकारा ( १५६८ ) व सनथ जयसूर्या ( १५१९ ) चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे.

२४ व्या षटकात विराटला माघारी पाठवण्यात किवी गोलंदाजाला यश आले. क्लार्कला डावातील तिसरी विकेट मिळाली. विराट २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर आदळला. भारताला ११८ धावांवर चौथा धक्का बसल्याने स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.