Sangli Voters : निवडणूक अवघ्या काही तासांवर; हुकमी मतदारांसाठी उमेदवारांची स्वतंत्र यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यरत
esakal January 15, 2026 08:45 AM

सांगली : महापालिका निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र यंत्रणा काम करीत आहे. ज्या प्रभागात चुरशीच्या लढती आहेत, अशा ठिकाणी बाहेरगावच्या हुकमी मतदारांवर विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यांच्या प्रवास, निवास, भोजनाच्या सोयीसाठी होणारा खर्चही मोठा आहे.

सांगली महापालिकेसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान होणार आहे. २० प्रभागांत ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी बहुतांश प्रभागात दुरंगी, तर अनेक प्रभागात तिरंगी लढत होत आहे. पक्षाच्या पॅनेलनिहाय परगावच्या मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका क्षेत्रातील मतदार असलेले मोठ्या संख्येने नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण अथवा इतर कारणांमुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह अन्य शहरांत वास्तव्यास आहेत.

बिनविरोधवर टांगती तलवार, ६९ प्रकरणी चौकशी होणार; नव्यानं निवडणूक? मनसेच्या याचिकेनंतर आयोग अॅक्शन मोडवर

हे मतदार निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकतात, हे लक्षात घेऊन उमेदवारांनी त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रवास भाडे, निवासाची सोय, भोजन, तसेच मतदानादिवशी शहरात थांबण्यासाठी स्पेशल गार्डन, लॉजची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आली आहे.

हा कार्यकर्ता बाहेरून येणाऱ्या मतदारांची माहिती संकलित करणे, त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे, त्यांच्या ये-जा वेळापत्रकाचे नियोजन, वाहनांची व्यवस्था, मुक्कामाचे ठिकाण आणि मतदानानंतर परतफेरीचे नियोजन करीत आहेत.

Sangli Election : पदयात्रा, मोटारसायकल फेऱ्या आणि घोषणांचा गजर; सांगली महापालिका प्रचाराचा शक्तिप्रदर्शनात शेवट

काही ठिकाणी प्रभागनिहाय किंवा बूथनिहाय समन्वयक नेमून कामाचे विभाजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चुरशीच्या प्रभागांमध्ये या मतदारांसाठी होणाऱ्या खर्चाचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानादिवशी शहरात येणाऱ्या मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

त्यामुळे निवडणूक प्रचारापेक्षा व्यवस्थापनावरच अधिक भर दिला जात असल्याचेही स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली खर्चमर्यादा लक्षात घेता उमेदवार अधिक सावध भूमिका घेत असले, तरी प्रत्यक्षात या व्यवस्थेवर मोठी रक्कम खर्च होत असल्याची चर्चा आहे. हा झालेला मोठा खर्च मतदार स्वतःहून मतदानासाठी येत असल्याचे सांगितले जाते.

निवडणुकीत प्रचाराबरोबरच बाहेरगावी असलेल्या मतदारांसाठीची व्यवस्था हा स्वतंत्र आणि महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. निवडणूक खर्चाचा आलेख वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मतदान आणि सहल...

बाहेरगावचे मतदार मतदानासाठी येत असताना अनेकजण सहकुटुंब सहलीवरच येत असल्याचे चित्र आहे. स्वतःच्या किंवा भाड्याच्या वाहनांतून जाता-येता देवदर्शनाचे नियोजन अनेकांनी केल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनाही उमेदवारांनी ठरावीक रक्कम दिल्याचे सांगण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.