३५ शाळांतील तीन हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ क्रीडा सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ ः रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ हा क्रीडा सोहळा १० व ११ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. डोंबिवली व परिसरातील तब्बल ३५ शाळांमधील तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत क्रीडा संस्कृतीचा जागर केला.
उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर आरपीएसएफ १२ वी बटालियनचे असिस्टंट कमांडंट दाहाके आणि इन्स्पेक्टर दिनेश कुमार यांनी मान्यवर म्हणून उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी विजय आव्हाड, अतुल शिंदे आणि स्वच्छता भागीदार सानू वर्गीज यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून उपक्रमाला बळ दिले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व समन्वय क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई आणि प्रोजेक्ट चेअरमन विवेक गोठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ २१ जानेवारी रोजी रोटरी भवन पार पडणार असून, विजेत्या संघांचा व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. ‘डोंबिवली ऑलिम्पिक २०२६’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मोठे योगदान मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
खिळाडुवृत्तीचे उत्कृष्ट दर्शन
आरपीएसएफ मैदानावर ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉर, कानविंदे हॉलमध्ये बॅडमिंटन, डोंबिवली स्पोर्ट्स अरेना टर्फवर फुटबॉल, तर रोटरी भवन येथे बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी क्रीडाविष्कार, शिस्त आणि खिळाडुवृत्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवले.