माजी महापौरांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
esakal January 15, 2026 10:45 AM

माजी महापौरांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, यात माजी महापौरांसह तब्बल ३५ माजी नगरसेवकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २०१७ च्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या या दिग्गजांना मतदार पुन्हा संधी देतात की नव्या चेहऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवतात, याचा फैसला उद्या निकालातून स्पष्ट होईल.

निवडणुकीत माजी महापौर विलास आर. पाटील, प्रतिभा विलास पाटील आणि जावेद दळवी यांच्यासह अनेक अनुभवी नगरसेवक आपले नशीब आजमावत आहेत. यात प्रामुख्याने माजी उपमहापौर मनोज काटेकर, ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, बाळाराम चौधरी आणि प्रकाश टावरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राजकीय वारसदारदेखील या निवडणुकीत प्रथमच रिंगणात उतरले आहेत. आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौघुले, विलास पाटील यांचे पुत्र मयुरेश पाटील, माजी उपमहापौर इम्रान खान यांची कन्या ईशा खान, माजी उपमहापौर अहमद सय्यद यांचे पुत्र आवेश आणि आमिर सिद्दिकी, माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या पत्नी सुचिता म्हात्रे निवडणूक रिंगणात आहेत. उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, भिवंडीचा ‘नवा कारभारी’ कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

निवडणुकीचे महत्त्वाचे आकडे
एकूण प्रभाग : २३
निवडून द्यायचे सदस्य : ९०
एकूण उमेदवार : ४३८ (यात १२१ अपक्ष उमेदवारांचा समावेश)
एकूण मतदार : ६,६९,०३३
पुरुष : ३,८०,६२३
महिला : २,८८,०९७
इतर : ३१३

प्रशासकीय तयारी आणि सुरक्षा
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
मतदान केंद्रे : ७५० (ज्यापैकी १५३ केंद्रे संवेदनशील घोषित)
निवडणूक कर्मचारी : ४,५०० कर्मचारी तैनात
निवडणूक निर्णय अधिकारी : ५ ठिकाणी ७ अधिकारी कार्यरत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.