शहापूर, ता. १४ (वार्ताहर) : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा शहापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने छडा लावला आहे. विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे पंधराहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील दोघांना धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कारसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डिसेंबरअखेरीस शहापूर शहरालगत असलेल्या चेरपोली हद्दीतील यमुनानगर परिसरात सुरेश पाटील यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून रात्री घरात प्रवेश केला होता. लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना शहापूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या सूचनेनुसार व पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने काम सुरू केले. उपनिरीक्षक अलोक खिसमतराव, हवालदार शशिकांत पाटील, विकास सानप, रमेश नलावडे, मोहन भोईर, दशरथ देसले, जितेंद्र गिरासे व कमलाकर शिरोसे यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत मोठ्या शिताफीने गुन्हा उघडकीस आणला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातून कैलास मोरे व जयप्रकाश यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून दोन लाख रुपये किमतीची कार आणि सोन्या-चांदीचे दागिने व तुकडे असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पंधराहून अधिक गुन्हे
अटक केलेले हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर धुळे, अमरावती, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, वर्धा व अहिल्यानगर जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत.