18138
विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरीकडे
कणकवलीतून माघवारी; सोळा दिवसांचा भक्तिमय प्रवास
कणकवली, ता. १६ : श्री क्षेत्र पंढरपूर येथील माघवारीला सिंधुदुर्गातील शेकडो वारकऱ्यांनी गुरुवारी कणकवलीतून पायी दिंडीने प्रस्थान केले. भालचंद्र महाराज संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी ही पायीवारी निघाली आहे. यंदा पायीवारीचे हे २६ वे वर्ष आहे. ३० जानेवारीला ही वारी पंढरपूरला पोहोचणार आहे.
भालचंद्र महाराज संस्थानातून ‘पांडुरंग राम कृष्ण हरी’च्या अखंड गजरात, हरिनामाचा झेंडा खांद्यावर घेत, टाळ-मृदंगाच्या नादात विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, बालगोपाळ अशा सर्व वयोगटांतील वारकरी या वारीत सहभागी झाले असून, विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस प्रत्येकाच्या मुखावर दिसून येत होती.
भालचंद्र महाराज संस्थान येथून प्रस्थान करून कलमठ येथील श्री काशिकलेश्वर मंदिर येथून आज (ता.१६) लोरे, खांबाळे मार्गे वैभववाडी येथे मुक्काम झाला. उद्या (ता.१७) रोजी गगनबावडा पळसंब मार्गे शेणवडे येथे, १८ रोजी शेणवडे-साळवण-कळे मार्गे कोपर्डे येथे मुक्काम होणार आहे. १९ जानेवारीला कोपर्डे-कोल्हापूर- मार्केट यार्ड विठ्ठल मंदिर मार्गे- हेरले येथे, २० रोजी हेरले-हातकणंगले येथे, २१ रोजी हातकणंगले-शिरोळ येथे, २२ रोजी शिरोळ-मिरज येथे, २३ रोजी मिरज-नृसिंहगाव विठ्ठल मंदिर येथे, २४ रोजी नृसिंहगाव-जुनोनी येथे, २५ रोजी जुनोनी-कमलापूर येथे मुक्काम राहील. २६ जानेवारीला कमलापूर येथून प्रस्थान करून मामासाहेब दांडेकर स्मृती आश्रम, श्री क्षेत्र पंढरपूर येथे रात्री मुक्काम होणार असून, २७ ते ३० जानेवारीदरम्यान पंढरपूर येथे दिंडीचा मुक्काम असेल. या सोळा दिवसांच्या भक्तिमय प्रवासात ठिकठिकाणी भाविकांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचा महाप्रसाद तसेच रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था स्थानिक भक्तांच्यावतीने केली आहे.