पिरंगुट, ता. १६ : पुणे जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा नुकतीच पुण्यातील संघाच्या कार्यालयात पार पडली. संघाचे कार्यकारिणी मंडळ व सदस्यांच्या या सभेस जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, संघाचे संस्थापक शिवाजीराव किलकिले, राज्य प्रतिनिधी आदिनाथ थोरात, माजी सचिव शांताराम पोखरकर, माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्तांच्या विविध समस्यांवर सभासदांनी चर्चा करून त्यावर मार्गदर्शन केले. ग्रॅच्युईटीची वाढलेली मर्यादा, सेवा निवृत्ती प्रस्ताव, विविध कारणांनी सेवानिवृत्तांची थकीत असलेली बिल आदी समस्यांवर विचारविनिमय करून पुढील काळामध्ये त्यांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी पेसा अंतर्गत दुर्गम भागातील वेतनवाढ, सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता, पदोन्नती, वरिष्ठ वेतन श्रेणी आदी बाबत चर्चा झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष कुंडलिक मेमाणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत मोहोळ, सचिव अविनाश ताकवले, विठ्ठल शितोळे, सूर्यकांत थोरात, भाऊसाहेब शिर्के, विनायक सुंबे, विठ्ठल कुंभार, जनक वर्पे, संजीव यादव, सूर्यकांत भसे, लिंबराज खुणे आदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.