Sindhudurg Health : ट्यूमर असताना गर्भवती ठरवले! धक्कादायक वैद्यकीय प्रकार; सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेची पोलखोल
esakal January 17, 2026 07:45 AM

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोटात ट्यूमर असलेल्या महिलेला गर्भवती असल्याचे चुकीचे निदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिक उपचारासाठी या महिलेला गोवा बांबुळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. तेथे तपासणी अंती हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने मोठ मोठे उपचार जिल्ह्यातच होतील, अशी अपेक्षा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु, प्रत्यक्षात चौथे वर्ष सुरू झाले तरी येथील आरोग्य यंत्रणेत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

या मेडिकल कॉलेजमधून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रुग्ण रेफर करण्याची संख्या कमीच झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. त्यातच आता चुकीचे निदान होऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्यूमर असताना गर्भवती असल्याचे निदान केलेली महिला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री  १ च्या सुमारास आढळली होती. याची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

Pune Robbery : रुग्णाच्या नावाखाली सापळा; सहकारनगर हद्दीत डॉक्टरला लुटणारे सीसीटीव्हीत कैद!

प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेला गर्भवती असल्याचे जाहीर करत प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे नमूद केले. त्यानंतर पहाटे सुमारे ४ च्या सुमारास तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले.

तेथे तिची सखोल तपासणी केली असता त्या महिलेला गर्भधारणा झालेली नसून तिच्या पोटात ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनीही नाराजी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.